
मुंबई : शिवसेना पक्षश्रेष्ठींच्या नाराजीमुळे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात 'साईडलाईन' झालेल्या रामदास कदम यांची शुक्रवारी विधिमंडळात घडलेल्या एका प्रसंगामुळे पंचाईत झाली. रामदास कदम यांनी आरटीपीसीआर चाचणी न केल्यामुळे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी त्यांना अडवले. त्यांच्याकडे कोरोना नेगेटिव्ह अहवाल नसल्यामुळे पोलीस त्यांना आत सोडायला तयार नव्हते. त्यामुळे कदम प्रचंड वैतागले होते. कदम यांनी सुरक्षा रक्षकांसोबत वादही घातला.
मात्र, तरीही त्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी फोनाफोनी केल्यावर बऱ्याच वेळानंतर त्यांना आत सोडण्यात आले. शिवसेनेतील त्यांचे जुने सहकारी आणि विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी त्यांच्या मदतीला धावून आले. एकनाथ शिंदे यांनी स्वत: हस्तक्षेप करत कदम यांना विधानभवनात प्रवेश मिळवून दिला.