Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

ओमायक्रॉनला रोखण्यास केंद्र सरसावले

ओमायक्रॉनला रोखण्यास केंद्र सरसावले

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची उच्चस्तरिय बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला. नवीन व्हेरिएंटबाबत आपल्याला अधिक सतर्क राहावे लागेल आणि खबरदारी बाळगावी लागेल, असे बजावतानाच मोदी यांनी या बैठकीत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

देशात ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. एकूण रुग्णसंख्या साडेतीनशेपार गेली आहे. त्यामुळे सरकार आणि आरोग्य यंत्रणा अधिक दक्ष झाल्या आहेत. ओमायक्रॉनला रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. केंद्राने सर्व राज्यांसाठी दिशानिर्देश जारी करत नाइट कर्फ्यू व अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीला कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल, आरोग्य सचिव राजेश भूषण, गृह सचिव ए. के. भल्ला व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी ओमायक्रॉनची सद्यस्थिती, राज्यांना दिलेल्या सूचना, लसीकरणाची स्थिती, आरोग्य सुविधा याबाबत तपशीलवार सादरीकरण पंतप्रधानांपुढे करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी अत्यंत महत्त्वाच्या सूचना केल्या असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

‘ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत सरकार पूर्णपणे सतर्क आहे आणि कृतीशील पावले टाकली जात आहे. नव्या व्हेरिएंटला रोखण्यासाठी उपाययोजना करताना त्यात एकसूत्रीपणा असावा यादृष्टीने नियोजन केले जात आहे. केंद्र सरकार सर्व राज्यांच्या संपर्कात आहे. राज्यांना पूर्ण सहकार्य करत आहे. ज्या राज्यात रुग्णसंख्या वाढत आहे तिथे केंद्राची पथके रवाना करण्यात येणार आहेत’, असे पंतप्रधानांनी नमूद केले. ओमायक्रॉन नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगवानपणे आणि प्रभावीपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणे आवश्यक आहे. त्यासोबतच चाचण्यांचा वेग वाढवताना लसीकरणावरही अधिक भर द्यायला हवा, अशा सूचना पंतप्रधानांनी केल्या. येणाऱ्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम हवी. त्यावर लक्ष केंद्रीत करावे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. लढाई संपलेली नाही...

‘कोरोनाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही. त्यामुळेच कोविड अनुरूप वर्तन आवश्यक आहे. त्यात कोणतीही ढिलाई नको. आपल्या आरोग्यासाठी आपल्याला हे करावेच लागेल’, असे नमूद करतानाच पंतप्रधानांनी देशातील जनतेला ओमायक्रॉनबाबत सावध केले. नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटला रोखायचे असेल तर आपण ‘सतर्क आणि सावध’ असलेच पाहिजे असे आवाहन मोदींनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा