Monday, May 5, 2025

देशमहत्वाची बातमी

देशात पुन्हा लॉकडाउन?

देशात पुन्हा लॉकडाउन?

नवी दिल्ली : ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत २३६ हून अधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. यानंतर दिल्ली, तेलंगणा, कर्नाटक, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा क्रमांक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्याची तयारी सुरु झाली असताना केंद्राकडूनही कठोर निर्णयाची शक्यता आहे. भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत.

ओमायक्रॉन विषाणूच्या वेगवान प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेऊन कोरोनास्थितीचा आढावा घेतला. आपण सतर्क आणि सावध राहायला हवे, असे नमूद करत मोदी यांनी कोरोनाप्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.

दरम्यान, आज पहाटे भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट केले असून त्यात त्यांनी देशात लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्यचकित होऊ नका, असे म्हटले आहे. तसेच उत्तर प्रदेश निवडणुकाही पुढे ढकलल्या जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

https://twitter.com/Swamy39/status/1474150848125030401

“ओमायक्रॉनमुळे लॉकडाउन जाहीर झाल्यास आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीखाली निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. यावर्षाच्या सुरुवातीला ज्या गोष्टी प्रत्यक्षपणे करु शकले नाहीत त्या पुढील वर्षी अप्रत्यक्षपणे केल्या जातील,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

मध्यप्रदेशमध्ये रात्रीची संचारबंदी

मध्य प्रदेश सरकारने रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ओमायक्रॉनबरोबरच कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचे मध्य प्रदेश सरकारने स्पष्ट केले.

चर्चमध्ये ५० टक्के उपस्थितीची मर्यादा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती बांधवांनी नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन करत राज्याच्या गृहविभागाने चर्चमध्ये क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत उपस्थितीला परवानगी असेल, असे गुरुवारी स्पष्ट केले.

नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री आदी वस्तू ठेवल्या जातात. यावेळी अंतरनियमासह कोरोना नियमांचे पालन करावे, मिरवणूक काढू नये, गर्दीचे कार्यक्रम आयोजित करू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment