मुंबई : या वर्षभरात जवळपास दर महिन्याला हजेरी लावणारा पाऊस डिसेंबरच्या शेवटीही पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात २८ डिसेंबरला औरंगाबाद, जालना आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊस बरसणार आहे. याशिवाय राज्यातील उत्तर भागातही पाऊस होणार आहे. जळगाव, धुळे या भागात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहिल. तर गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे.
पश्चिम महाराष्ट्रत तुरळक पाऊस होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. वारा (३० ते ४० किमी ताशी) वेगाने पुढे सरकेल. तर २७ डिसेंबरला विर्दभात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात यावर्षी पावसाळ्यासह उन्हाळा आणि हिवाळ्यातही पाऊस बरसला. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी भरपाई देण्याची मागणी विरोधीपक्षांनी केली आहे. सध्या काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या वतीने देण्यात आली.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही राज्यात पावसाच्या सरी बरसल्या होत्या. नुकतीच थंडी सुरू झाल्याने सर्वत्र तापमान खालावले आहे. मात्र पावसामुळे काही काळासाठी थंडी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.