Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडी२०२१ मध्ये ‘हे’ सेलिब्रिटी अडकले लग्नबंधनात

२०२१ मध्ये ‘हे’ सेलिब्रिटी अडकले लग्नबंधनात

मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे २०२० ची लग्न सगळ्यानी एक वर्षे पुढे ढकलली आणि यात सेलिब्रिटीही काही मागे नव्हते. काहींचा साखरपुडा झाला होता तर काहींची लग्न ठरली होती. पण कोरोनाचा वाढता कहर पाहता सेलिब्रिटींनाही लग्नसराईसाठी २०२१ ची वाट पाहावी लागली आणि २०२१ची पहाट होताच काही मराठी सेलिब्रिटींची लग्न दणक्यात पार पडली.

वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री अभिज्ञा भावे, अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मानसी नाईक यांच्या लग्नाचा बार उडाला. दि. 19 जानेवारीला अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा लग्न बंधनात अडकले. या दोघांच्या लग्नाची कित्येक दिवस मराठी सिनेसृष्टीमध्ये चर्चा होती. पुण्यात या दोघांच्या लग्नाचा अनोखा थाट दिसून आला.  प्रदीप हा बॉक्सर तर मानसी ही मराठीतील नामवंत अभिनेत्री…पुण्यात अगदी पारंपरिकरित्या मोजक्याच निमंत्रकांच्या साक्षीने या दोघांचं ‘शुभलग्न’ पार पडलं. या दोघांच्या लग्नाचे, मेहंदीचे, हळदीचे फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.

तर मालिका विश्वामध्ये आपल्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे ही मेहुल पैसह याच वर्षी लग्न बंधनात अडकली. अभिज्ञा आणि मेहूल पै यांचा ऑक्टोबर २०२० मध्ये साखरपुडा झाला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  या दोघांचं लग्न २०२१ मध्ये करण्याचं ठरलं. त्याप्रमाणे अभिज्ञा आणि मेहुलने लग्नाची सगळी तयारी सुरू केली…मेहुल हा सिनेसृष्टीतला नसल्यामुळे अभिज्ञाने मीडियाला या लग्नापासून चार हात लांबच ठेवलं होतं. पण या लग्नाला सिनेसृष्टीतल्या आपल्या जवळच्या मित्रमंडळींना ती बोलवायला काही विसरली नाही.  अभिज्ञाच्या लग्नात सिध्दार्थ चांदेकरसह अनेक मराठी सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली होती.

अभिज्ञा आणि मेहुलने लग्नात पर्पल रंगाला प्राधान्य दिलं होतं. तर अभिज्ञाच्या हटके मंगळसूत्राचीदेखील चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. लग्नानंतर अभिज्ञाने तिच्या लग्नाचा एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

अभिज्ञाचं हे दुसरं लग्न आहे. अभिज्ञानं २०१४ मध्ये वरुण वैतीकरशी लग्न केलं होतं. पण त्या दोघांचं नात फार काळ टिकू शकलं नाही आणि मग ते वेगळे झाले. त्यानंतर २०२१ मध्ये नव वर्षांच्या सुरुवातीला अभिज्ञा दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकली. अभिनय क्षेत्रात येण्याआधी अभिज्ञा एअर होस्टेस होती.

अभिज्ञा प्रमाणेच अभिनेता सिध्दार्थ चांदेकरनेही त्याच्या लग्नात मीडियाला एन्ट्री दिली नव्हती…पण त्याचं लग्न राजेशाही थाटात पुण्यातील ढेपे वाड्यात पार पडलं होतं. सिध्दार्थने अभिनेत्री मिताली मयेकरसह लग्न केलं. दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंन्टाइन्स डेच्या दिवशी सोशल मीडियावर सिद्धार्थ आणि मिताली यांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर दोघांचा साखरपुडा पार पडला होता. खरंतर तर साखरपुड्यानंतर लगेचच त्यांचं लग्न होणार होतं. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे त्यांना २०२१ ची प्रतीक्षा करावी लागली आणि अखेर २४ जानेवारी २०२१ रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकले. लग्नाआधी हे दोघे लिव्हइन रिलेशनशीपमध्ये राहत होते.

अभिनेता आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी या वर्षी (२०२१) व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रजिस्टर्ड मॅरेज करून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. लग्नात आस्तादच्या अंगठीवर रोमन लिपीत १४.२.२०२१ हे आकडे लिहले होते. त्यामुळे तो आपल्या लग्नाची तारीख कधीच विसरणार नाही.

याच वर्षी म्हणजे २०२१ मध्ये मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णीच्या लग्नाचे सनई चौघडे वाजले. दुबईस्थित कुणाल बेनोडेकरशी सोनालीने दुबईमध्ये लग्न करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. ७ मे रोजी सोनाली आणि कुणालने दुबईमध्ये एका मंदिरात लग्न केलं आणि सोनालीच्या वाढदिवसाचं  (१८ मे ) औचित्य साधून तिने ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. यासोबतच तिने लग्नाचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

सोनालीने दुबईत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न केलं. विशेष म्हणजे या लग्नाला सोनालीचे आई- बाबा आणि कुणालचे आई- बाबाही नव्हते. ७ मे रोजी दोघांनी दुबईतील एका मंदिरात लग्न केलं.  अवघ्या दोन दिवसांत सोनाली आणि कुणालने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची तयारीही केली. एका तासात लग्नाची खरेदी केली आणि १५ मिनिटांत अवघ्या चार लोकांच्या साक्षीने मंदिरात वरमाळा, मंगळसूत्र आणि कुंकू या तीन गोष्टी घेऊन विवाह प्रमाणपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या. आणि ‘अब से हम ७ मे’ अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर करून सोनालीने लग्नाची गुडन्यूज शेअर करून सगळ्यांना सुखद धक्का दिला होता.

२०२१ मध्येच अभिनेता संग्राम समेळने दुसरं लग्न केलं. प्रसिध्द कोरिओग्राफकर श्रध्दा फाटक हिच्याशी

त्याने केलं . इचलकरंजी येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला…संग्रामचं हे दुसरं लग्न आहे. त्यानं २०१६ मध्ये अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्या सोबत लग्न केलं होतं. परंतु त्यांचं लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही.

अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावेचा विवाहसोहळादेखील याच वर्षी पार पडला… २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सुयश आणि आयुषीने लग्नगाठ बांधली.. १९ ऑक्टोबर रोजी त्यांचा मेहंदी आणि हळदीचा समारंभ पार पडला. त्यांच्या हळदीचे फोटोदेखील सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाले होते..

बॉलीवूडमध्ये अभिनेत्री कतरीना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचा बार उडाला. ९ डिसेंबर (२०२१)रोजी राजस्थानमध्ये ही ‘रॉयल वेडिंग’ पार पडली. सवाई माधोपूर येथील ‘सिक्स सेन्सेस’चा किल्ला या वेडिंगसाठी निवडला होता. या दोघांच्या लग्नामुळे  हा किल्ला लाखो  दिव्यांनी उजळून गेला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -