
कणकवली : गेले पन्नास दिवस सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याच्या प्रकाराने आज कणकवली आगारातील वातावरण तणावपूर्ण झाले.
आज सकाळी १० वाजता सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांच्या चालकाने शिवीगाळ करत संपकरी कर्मचाऱ्यांच्या अंगावर बोलेरो गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामुळे कणकवली एसटी आगारातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत.
अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केलेल्या ड्रायव्हरने येऊन माफी मागावी अन्यथा पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करणार असल्याचे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले. संबंधित घटनेची माहिती घेण्याकरिता कणकवली पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत आहेत.