जळगाव : जळगावातील सिंधी कॉलनीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या अभियंत्याच्या डोक्यात टिकाव घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणार्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीतील टिकमराम परमानंद पोपटानी यांनी ७५ दिवसांपासून वीजबिल भरले नव्हते. या वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जयेश तिवारी सिंधी कॉलनीत गेले. त्यांनी पोपटानी यांना वीजबिल भरण्यास सांगितले. याचा राग आल्याने पोपटानी यांनी घरातून चक्क खोदकाम करण्यासाठी वापरल्या जाणारा टीकाव आणला व शिवीगाळ करत तिवारी यांच्या डोक्यात टाकून जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिवारी यांच्यासोबतच्या इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला.
त्यांनी पोपटानी यांना बाजूला केले. मात्र, तरीही पोपटानी यांनी मारहाणीचा प्रयत्न केला. या प्रकरणी अभियंता तिवारी यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित टिकमराम पोपटानी याला अटक केली आहे.
अभियंत्यासोबत असलेल्या कर्मचार्यांनी संबंधित घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यात पोपटानी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. शिवीगाळ, आरडाओरड करत गोंधळ घालताना दिसत आहे. या घटनेने वीज कंपनीच्या कर्मचार्यांसह अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वीज बिलाच्या वसुलीसाठी एकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सक्ती तर दुसरीकडे अशा पद्धतीने ग्राहकांकडून जीवघेणे हल्ले होत असतील तर काम कसे करायचे, असा प्रश्न वीज कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.