मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षीत विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर केला आहे. त्यानुसार २७ डिसेंबरला या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात येतील. त्यानंतर २८ डिसेंबरला निवडणुकीसाठीचे मतदान पार पडेल.
या निवडणुकीत भाजपकडूनही आपला उमेदवार रिंगणात उतरवला जाण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या शुक्रवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला महाविकासआघाडी आणि भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते.
यावेळी विरोधकांकडून हिवाळी अधिवेशनाचा कालावधी आठवडाभराने वाढवण्याची मागणी करण्यात आली. मात्र, राज्य सरकारने अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन नियोजित वेळापत्रकाप्रमाणे २८ डिसेंबरला संपेल. याच दिवशी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडेल.
अनेक प्रश्नांवर राज्य सरकारने अद्याप उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, असे विरोधकांचे म्हणणे होते. इतक्या कमी कालावधीत जनतेच्या समस्या कशा मांडणार, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.