
मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या व्हॉट्स अॅपवरील धमकीची तसेच लोकप्रतिनिधी वा मंत्र्यांना मिळणाऱ्या अशा स्वरूपाच्या धमक्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरूवारी विधानसभेत केली.
शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्स अॅपवर मिळालेल्या धमकीचा विषय उपस्थित केला. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी एसआयटी नेमून तपास करण्याची मागणी केली. अशा धमक्यांमागे सनातन संस्थासारख्या संस्था आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या धमकीचा निषेध केला. सनातन संस्थेबद्दल इतका त्रास असेल तर दोन वर्षे सत्तेत आहात, का बंदी घातली नाही? असा सवाल त्यांनी केला. या संस्थेविरूद्ध कोणतेही पुरावे आढललेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सुधीर मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना मिळालेल्या धमकीची आठवण करून दिली. या प्रकरणी अजूनही कोणाला अटक झालेली आहे. आपण पोलिसांवर १५ हजार कोटी खर्च करतो. आरोपी सापडत नाहीत. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडतात. कोणी ठेवल्या हे कळत नाही. काय चालले आहे हे? असा सवाल त्यांनी केला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अशा कितीतरी जणांना धमक्या मिळाल्या आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी आमदारांची एक समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे नाना पटोले यांनीही ही गंभीर बाब असून यावर कडक उपाययोजना करण्याची मागणी केली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याला उत्तर दिले. या व अशा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या प्रकरणी बेंगळुरूमधून जयसिंग रजपूत नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.