चेन्नई : ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना आता तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूत ओमायक्रॉनचे (Omicron) एकाचवेळी ३३ रुग्ण आढळून आले आहेत. तर पश्चिम बंगालमधील शाळेत कोरोनाचा (Corona) स्फोट झाला आहे. एका शाळेतील २९ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
तामिळनाडूमध्ये ओमायक्रॉनचे ३३ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री एम. सुब्रमण्यम यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णाची संख्या ३४ झाली आहे. यापूर्वी केंद्राने सकाळी जाहीर केलेल्या यादीत तामिळनाडूत फक्त १ रुग्ण असल्याचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर देशातील ओमायक्रॉनचा वाढता धोका आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात आढावा बैठक घेणार आहेत.
एकीकडे तामिळनाडून ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असताना दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील एका शाळेतील २९ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पश्चिम बंगालमधील कल्याणी येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ९ वी आणि १० वी च्या एकूण २९ विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आहे. संसर्ग झालेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांना सर्दी आणि कफ आहे. त्यांच्या पालकांना याची माहिती दिली गेली आहे. विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्याचं आवाहन पालकांना करण्यात आलं आहे, अशी माहिती शाळेच्या प्राचार्य मौसमी नाग यांनी केलं आहे.