Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडीपेंग्विन आठवतात, पण लोकांची दुरवस्था दिसत नाही

पेंग्विन आठवतात, पण लोकांची दुरवस्था दिसत नाही

'त्या' अधिकाऱ्यांनी मार खाल्ला तर आमची जबाबदारी नाही; मनसेने दिला अल्टिमेटम

मुंबई : मुंबई महापालिकेचा अतिशय धिसाडघाईत कारभार सुरू असून महापालिकेत विरप्पन गँग कामाला आहे. या विरप्पन गँगने संपूर्ण महानगरपालिकेची वाट लावली आहे. यांना राणीच्या बागेतील पेंग्विन आठवतात, पण लोकांची दुरवस्था दिसत नाही, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी केली आहे.

उपनगरातील मलनिस्सारण केंद्र गेल्या दोन वर्षांपासून बंद असून येत्या तीन दिवसांमध्ये ते केव्हा सुरू होणार त्याची वेळ आम्हाला कळवावी, नाहीतर मग मात्र आम्हाला मनसेच्या स्टाइलने गोष्टी सरळ कराव्या लागतील, मग त्यात कोणत्या अधिकाऱ्याने मार खाल्ला तर त्याची जबाबदारी मनसेची नाही, असा इशाराही संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.

मलनि:स्सारण केंद्रावर बोलताना देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्री परदेशात गेले. त्यांनी डोळे उघडावेत आणि मलजल प्रक्रिया केंद्राची काय अवस्था आहे ती त्यांनी पाहावी. येथील पाण्यावर प्रक्रिया होऊन ते समुद्रात सोडणे आवश्यक आहे. तसा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नियम आहे. पाण्याचा दर्जा तपासून ते स्वच्छ करून मगच ते समुद्रात गेले पाहिजे असा नियम आहे. हा नियम धाब्यावर बसवण्यात आला असून गेल्या दोन वर्षांपासून हे मलजल केंद्र बंद आहे, असे देशपांडे म्हणाले.

येथील अवस्था बिकट आहे. येथील सुरक्षा रक्षकांची अवस्थाही बिकट आहे. येथे साप फिरत असतात, कोल्हे येतात. त्यांना कुठली चौकीची व्यवस्थाही नाही. बाजूलाच डम्पिंग ग्राउंड आहे. तेथून चोर येथे घुसतात आणि केबल कापून टाकतात. त्यामुळेच या केंद्रामधील कोणत्याही मशीन सुरू नाहीत. ज्या महानगरपालिकेचा ३६ हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे, त्या पालिकेची जर अशी अवस्था असेल तर आपण विकासाच्या गप्पा या कोणासाठी मारायच्या आणि कशासाठी मारायच्या असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.

पर्यावरणमंत्र्यांची समस्या ही पार्टी, स्वित्झर्लंड, स्कॉटलँड येथे जायचे, तिथे पुरस्कार घ्यायचे आणि शो शायनिंग करत फिरायचे. प्रत्यक्षात काय होत आहे कोण पाहणार. त्यामुळे जरा पर्यावरण मंत्र्यांनी वेळ मिळाल्यास एकदा डोळे उघडून पर्यावरणाकडे पाहावे, अशी आमची त्यांना विनंती आहे, असा टोला संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

पूर्व मुंबई उपनगरातील मुंबई महानगरपालिकेचा मलनिस्सारण प्रकल्प दोन वर्षापासून बंद आहे. सांडपाणी हे विनाप्रक्रिया समुद्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मुंबई उपनगराचे पालकमंत्री असून त्यांच्याच विभागात हा प्रकार सुरू असल्याचा मनसेचा आरोप आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकल्पाला भेट दिली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्विझर्लंड, स्कॉटलांडमध्ये फिरायचं आणि अवॉर्ड घ्यायचे पण स्वतःच्या विभागाकडे दुर्लक्ष करायचं. पार्ट्या करण्यापेक्षा त्यांनी याठिकाणी डोळे उघडे ठेवून बघावं म्हणजे परिस्थिती लक्षात येईल, असे आरोप करत संदीप देशपांडे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -