
मुंबई : शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूतला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने त्याला बंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. जयसिंग राजपूत हा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा फॅन असल्याचे सांगत आहे.
बंगळुरूहून अटक करण्यात आलेला आरोपी जयसिंग राजपूत (वय ३४) याने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता. त्या संदेशात त्याने 'सुशांत सिंह राजपूतला तु मारलं, आता नंबर तुझा' अशा आशयाचा संदेश राजपूतने आदित्य ठाकरे यांना केला होता. त्या संदेशाला ठाकरे यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर राजपूतने तीन फोनही केले. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले होते. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसा संदेश त्याने आदित्य ठाकरेंना पाठवला होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने ठाकरेंना अश्लील शब्दात शिवीगाळ देखील केली होती.
या प्रकरणी ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी जयसिंग बंगळुरू येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी त्याला अटक केली.