Tuesday, June 24, 2025

आयपीएलचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला

आयपीएलचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला

नवी दिल्ली: आयपीएलच्या आगामी हंगामाचा ( २०२२) मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी सर्व फ्रँचायझींना याबाबत माहिती दिली. लखनौ आणि अहमदाबाद हे आणखी दोन संघ सामील झाल्यामुळे पुढील लिलावामध्ये १० संघ सहभागी होतील. अनेक प्रमुख क्रिकेटपटू थेट लिलावात असल्याने मोठी बोली लावली जाऊ शकते.



दरम्यान, लखनौ आणि अहमदाबाद फ्रँचायझींसाठी १ डिसेंबरपासून रिटेन्शन विंडो सुरू झाली आहे. लिलावापूर्वी प्रत्येकी ३३ कोटी रुपये खर्च करून दोन्ही संघ प्रत्येकी ३ खेळाडूंना कायम (रिटेन) ठेवू शकतात. या खेळाडूंसाठी अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटींचे शुल्क आकारू शकतात. तसेच, तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय असणे आवश्यक आहे.



आयपीएल २०२२चा हंगाम २ एप्रिलपासून सुरू होऊ शकतो. पहिला सामना चेन्नईत होणार आहे. यावेळी सामन्यांची संख्या वाढल्यामुळे आयपीएलचा एकूण कालावधी ६० दिवसांहून अधिक वाढू शकतो. ४ किंवा ५ जूनला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. मात्र, सर्व संघांना पूर्वीप्रमाणे प्रत्येकी १४ सामने खेळावे लागणार आहेत. सात सामने घरच्या मैदानावर तर तितकेच सामने ‘अवे’ खेळवले जातील.
आयपीएल २०२०चा संपूर्ण हंगाम, तर आयपीएल २०२१चा अर्धा हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र बोर्डाचे सचिव जय शहा यांनी सध्याचा हंगाम देशातच होणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment