
मुंबई : पी. एस. विनोथराज यांचा 'पेबल्स' चित्रपट आता ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्करच्या पुढील फेरीमध्ये हा चित्रपट प्रवेश मिळवू शकला नाही. त्यामुळे या चित्रपटाला स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. इंटरनॅशनल फिचर फिल्म श्रेणीमध्ये आता अंतिम 15 चित्रपटांची नावं घोषित झाली आहेत. बुधवारी अॅकेडमीच्यावतीनं या चित्रपटांची नावं घोषित करण्यात आली होती. पेबल्सच्या निर्मात्यांनी मात्र ऑस्करवर नाराजी व्यक्त केली आहे.
निर्माता विघ्नेश शिवन यांनी व्टिट करुन नाराजी जाहीर केली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, आमचा चित्रपट का सिलेक्ट झाला नाही याचा आम्हाला आता विचार करावा लागणार आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे आमची निवड झाली नाही हे जाणून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. मात्र जे यश मिळालं ते देखील कमी नाही. हे आवर्जुन सांगावसं वाटतं. आमची निवड झाली असती तर तो आणखी एक बहुमान ठरला असता असं वाटतं. मात्र ते काही शक्य झालं नाही. त्यामुळे थोडी निराशा वाट्याला आली आहे. अशा शब्दांत निर्मात्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.