प्रियानी पाटील
खरं तर २०२१ हे वर्ष संपता संपताच विवाहाचे वय १८ ऐवजी २१ वर्षे असावे, असे विधेयक मंजूर होऊन त्यास विरोधही होताना दिसून आला.
का असावे १८ ऐवजी २१ हे मुलीचे विवाहाचे वय, विचार केला, तर काहींना पटेल, काहींना पटणारही नाही, कारण मुलीच्या भवितव्याची व्याख्या ही ज्याच्या त्याच्या दृष्टीने जरी निराळी असली, तरी १८ म्हणजे अपूर्ण आणि २१ म्हणजे पूर्ण म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. कारण, १८व्या वर्षी ना मुलीचे शिक्षण पूर्ण होते, ना ती मानसिक, शारीरिकदृष्ट्या सक्षम बनते. २१चा विचार केला, तर मुलगी उच्चशिक्षित होऊन विचार, ज्ञानाने, विचारांनी पुढारलेली असतेच शिवाय आर्थिकदृष्ट्याही सक्षम बनण्याच्या उंबरठ्यावर ती उभी असते. स्वत:साठी जगता जगता आई – वडिलांसाठी आधार बनते. तिची मते, निर्णय घेण्याची क्षमता तिच्यामध्ये निर्माण झालेली असते. याचाच अर्थ भविष्यात तिच्यावर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराला वाचा फोडण्याची ताकद तिच्यात निश्चितच निर्माण झालेली असते.
पण, वयाच्या अठराव्या वर्षी मुलगी किती सज्ञान बनते, किती सक्षम बनते, तिची किती स्वप्नं पूर्णत्वास जातात, ना ती स्वत:साठी जगते, ना ती तिच्या आई-वडिलांसाठी जगते, एकदा का सासरी पाऊल पडले की, तिची मतं, तिची स्वप्नं, तिचं शिक्षण, तिचं करिअर या सगळ्याला अर्धविराम मिळालेला असतो. विवाहाचे वय १८ म्हणून मुलीच्या विवाहाची घाई केली जाते खरी, पण तिचे कोवळे आयुष्य परिपक्व होण्याआधीच ती कोमेजून गेलेली असते. मुलीचं बालपण सरता सरताच शिक्षणात, मैत्रीच्या गोतावळ्यात रमणारं तिचं मन, काहीसं उच्च शिक्षण, करिअरच्या दिशेने झुकत असतानाच, कायद्याने विवाहाचे वय १८ म्हणून मग कसलाही विचार न करता, तिचा विवाह कोवळ्या वयातच उरकून मुलीची सासरी पाठवणी केली जाते, तेव्हा हा विवाह खरंच तिची मानसिकता, तिचे शिक्षण, तिच्या करिअरचा विचार करून केला जातो का? असा प्रश्न निर्माण होतो.
एका जबाबदारीतून बाहेर पडण्यासाठी मुलीच्या लग्नाचे वय १८ झाले की, तिच्या विवाहाची तयारी सुरू केली जाते; किंबहुना मुलगी वयात आली की, तिच्या विवाहाचे टेन्शनच जणू आई-वडिलांना येते आणि शिक्षण पूर्ण होण्याअगोदरच सनई चौघडे दारी वाजू लागतात.
पण, मुलीच्या या कोवळ्या वयात तिच्यावर लादली जाणारी जबाबदारी, माहेर सोडून, सगळ्या मैत्रिणींचा गोतावळा सोडून परक्या घरी जाणवणारे अवघडलेपण तिच्यावर नकळतपणे लादले गेल्यासारखेच असते. मात्र, आपली मुलगी संसार सांभाळण्यास खरंच सक्षम आहे का, तिच्या मनात शिक्षणाची आस आहे का, तिला नोकरी करायची असेल तर…, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन तसा विचारही करणे तेवढेच गरजेचे आहे.
दरम्यान शिक्षणाचा विचार केला तर, वयाच्या १८व्या वर्षी विवाह करताना मुलीचे शिक्षण हे अर्धवटच राहते. जेमतेम बारावी झाल्यावर ना तिचे उच्च शिक्षण पूर्ण होते, ना तिला कोणता कोर्स करून करिअरच्या दृष्टीने निर्णय घेता येतो. शिवाय विवाहानंतर शिक्षणाचे दरवाजे आपणच बंद केल्यात जमा होऊन बसतात. याचा परिणाम नकळतच तिच्या पुढच्या पिढीवर होतो.
मुलींचे कोवळ्या वयात होणारे विवाह, त्यांची होणारी होरपळ, तिच्या नशिबी येणारं कधी सुख, तर कधी दु:ख या साऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी कमी पडणारी तिची मानसिकता, लहान वयातच उद्भवणाऱ्या विवंचना, पर्यायाने पालकांसमोर निर्माण होणाऱ्या समस्या पाहता, मुलगी आणि लग्नाचे वय यावरून चाललेल्या गेल्या चार वर्षांपासूनच्या प्रश्नाला आता १८ वरून २१ ला मिळालेली मंजुरी ही बऱ्याच अंशी मुलीच्या भवितव्याच्या दृष्टीने स्वागतार्हच म्हणावी लागेल. १९१८ साली मुलींचे वय १८ वरून २१ करावे, असे खासगी विधेयक खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेत सादर केले होते. या विधेयकाला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. मात्र, आता या विधेयकास विरोधकांकडून विरोध झालेला दिसून आला आहे.
पूर्वी वयाच्या अवघ्या बारा-तेरा वर्षांत होणारे मुलींचे विवाह पाहता, मुलींचे आयुष्य चार भिंतीत जखडले गेलेलेच दिसून आले. शिक्षणाची कमतरता, ज्ञानाचा अभाव, होणारी मानहानी, चूल आणि मूल ही जखडून राहिलेली परंपरा जसजशी दशके पुढे गेली तरीही हे वाक्य अगदी व्याख्येप्रमाणेच विवाहितेला चिकटून राहिले.
जे पालक मुलींच्या करिअरचा विचार करतात, तेथे आज विवाहापेक्षा मुलींच्या करिअरमध्ये अधिक स्पर्धा दिसून येत आहे. यासाठी मुलींची कोवळ्या वयात लग्न होऊन तिला सासरी पाठवून तिचं सारं आयुष्य जखडून ठेवण्यापेक्षा तिच्या करिअरला पसंती देणारा पालकवर्गही आज दिसून येतो. आज उच्च शिक्षण घेतलेली मुलगी स्वत: कमावते, करिअरचा नवा पायंडा तिने रुजवला आहे. किंबहुना नोकरी आणि घर सांभाळणारी ती कुशल महिला ठरत आहे. याचबरोबर सासर-माहेर अशी नातीही जपताना आयुष्य सार्थकी लागत असल्याचा तिला अभिमान वाटला, तर यात वावगे काहीच नसावे.
याचसाठी हवे आहे मुलीच्या विवाहाचे वय १८ ऐवजी २१ की जेणेकरून मुलीचे आयुष्य खऱ्या अर्थाने सार्थकी लागू शकेल. यासाठी हवे २१ वर्षं की, तिच्या शिक्षणाचा, तिच्या करिअरचा, तिच्या भवितव्याचा विचार करून कायद्यानेही तिचे भवितव्य रेखले गेले, तर तिच्या शिक्षणात राहणारी अपूर्णता निश्चितच पूर्णत्वास जाऊ शकेल. शिवाय तिचे करिअर, आर्थिकदृष्ट्या ती सक्षम होऊन तिचे भवितव्य ती खंबीरपणे घडवू शकेल. यासाठीच हवे आहे विवाहाचे वय १८ ऐवजी २१.
[email protected]