मुलुंड : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विधान भवनावर गुरूवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केले. ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चाला मुलुंड मधील वंचित बहुजन समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
वंबआचे महाराष्ट्र उपाध्यक्ष गोविंद दळवी, प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे, उपाध्यक्ष फारूक अहमद, प्रशिक्षक महेंद्र रोकडे, मुंबई अध्यक्ष अब्दुल हसन खान, महासचिव आनंद जाधव, उपाध्यक्ष व तालुकाध्यक्ष व महिला तालुका अध्यक्ष, इत्यादी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुलुंड पश्चिम येथील आंबेडकर चौकात वंबआच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला. ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ह्या घोषणा कार्यकर्त्यांकडून येथे दिल्या गेल्या. जमावावर लक्ष ठेवण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त मुलुंडमध्ये या मोर्चाच्या निमित्ताने ठेवण्यात आला होता.
मुलुंड तालुक्याच्या वतीने वंबआचे तालुका अध्यक्ष राहुल जाधव, उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, महासचिव शंकर सोनवणे, सरकारी यंत्रणाचे अध्यक्ष हरीश जाधव, पोलीस समिती अध्यक्ष नवनाथ कांबळे, दिनेश गेजगे, आयटी सेल प्रमुख शिवानंद सानादे, वॉर्ड अध्यक्ष अनिल शिंदे, सागर वानखडे, राजू संगारे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंडमधील कार्यकर्ते रेल्वेने प्रवास करत मोर्चात सामील झाले होते. महाराष्ट्रभरातून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित होते.