Tuesday, May 6, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

राज्यात ‘ओमायक्रॉन’चे आणखी २३ रुग्ण

राज्यात ‘ओमायक्रॉन’चे आणखी २३ रुग्ण

मुंबई  :राज्यातील कोरोना संसर्ग अद्याप पूर्णपणे ओसरलेला नसताना, आता हळूहळू ‘ओमायक्रॉन’बाधितांच्या संख्येतही भर पडताना दिसत आहे. राज्यात गुरूवारी २३ नवे ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत. तसेच, दिवसभरात १ हजार १७९ नवीन कोरोनाबाधितांची देखील नोंद झाली आहे. तर, ओमायक्रॉनची वाढती रुग्ण संख्या आणि कोरोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांमध्ये कमी होत असताना आता ती देखील पुन्हा एकदा वाढू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.


राज्यात आजपर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. तर, मागील २४ तासात राज्यात ६१५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, १७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात ६५,००,३७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.७ टक्के आहे. तर, मृत्यू दर २.१२ टक्के आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा राज्यात वेगाने प्रादुर्भाव होत आहे. यापूर्वीच्या करोनाच्या दोन लाटांमध्ये हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा दुप्पट झाला आहे. मुंबईत कोरोनाचा पुन्हा एकदा वेगाने फैलाव होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार नाताळ आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला होऊ घातलेल्या कार्यक्रमांवर निर्बंध लादणार का, हे पाहावे लागेल.

Comments
Add Comment