
भाजपाचे सदस्य मंगलप्रभात लोढा यांनी एसटीमधल्या एका अपहार व अनियमिततेच्या एका तारांकित प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असल्याची माहिती दिली. त्यावर भाजपाचे सदस्य आक्रमक झाले. त्यावेळी नितेश राणे यांनी या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी केली. त्यावेळी परिवहन मंत्री राणे यांना त्यांच्या स्थानावर बसण्याचा आग्रह धरू लागले. त्यामुळे या दोघांमध्ये जोरदार बाचाबाचीही झाली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला जागा देण्याचे अधिकार अध्यक्षांना आहेत. त्यात कोणत्या सदस्याला कोणते आसन द्यायचे हे ठरविण्याचा अधिकार आमचा आहे, असे सांगत राणे यांच्या आसनाचे समर्थन केले. तितक्यात उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पुढचा प्रश्न विचारला व पुढे बाचाबाची थांबली. एस.टी. महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना आणि मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना वेळेवर निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्यासाठी महामंडळ सकारात्मक असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मेघना साकोरे बोर्डीकर, राजेश पाटील यांच्या एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.