मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वीच दहा जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी झालेल्या आरटीपीसीआर चाचणीत आठ पोलिसांसह १० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यापैकी दोन विधीमंडळाचे कर्मचारी आहेत.
सत्र सुरू होण्यापूर्वी सुमारे ३५०० लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामधील दहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या नमुन्यांच्या जीनोम सिक्वेन्सिंगबाबत निर्णय घेणे बाकी आहे. अधिवेशनापूर्वी या कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे सर्वांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण मिळाले असून आतापर्यंत ओमायक्रॉनचे ६५ रुग्ण एकट्या महाराष्ट्रात मिळाले आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.