Saturday, July 5, 2025

इसमाच्या बॅगमधील पिस्तुलाची चोरी

इसमाच्या बॅगमधील पिस्तुलाची चोरी

नाशिक- भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेलेल्या इसमाच्या बॅगमधील एक लाख रुपये किमतीची पिस्तूल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना जय भवानी रोड येथे घडली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रमोदकुमार यादव (रा. लवटेनगर, जय भवानी रोड, नाशिकरोड) हे दि. 19 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता बिटको हॉस्पिटलच्या शेजारील मार्केटमध्ये भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले होते. भाजीपाला घेऊन यादव हे जय भवानी रोडवरील शकुंतला पेट्रोल पंपाजवळ थांबले. त्यावेळी सैन्यभरतीसाठी आलेल्या काही अनोळखी मुलांनी भरतीसंदर्भात यादव यांच्याकडे विचारपूस केली आणि ते तेथून निघून गेले.


फिर्यादी यादव हे घरी आले असता त्यांनी बॅगमधील भाजीपाला बाहेर काढला. त्यावेळी त्यांना बॅगमध्ये ठेवलेली सुमारे 1 लाख रुपये किमतीची 32 एनपीबी पिस्तूल दिसली नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली, की ही पिस्तूल अज्ञात व्यक्तीने त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेली. या प्रकरणी यादव यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बोरसे करीत आहेत.

Comments
Add Comment