नवी दिल्ली (हिं.स.) : करचुकवेगिरीत सहभागी असलेल्या चिनी मोबाईल कंपन्यांवर आज, बुधवारी आयकर विभागाने धाडी टाकल्या. राज्यातील मुंबईसह दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि दक्षिण भारतातील बंगळुरू, हैदराबाद या शहरांमध्ये सकाळी ९ वाजता एकाच वेळी छापे टाकण्यास सुरुवात झाली. चीनी मोबाईल कंपनी Oppo आणि Mi च्या कार्यालयात ही कारवाई करण्यात आली आहे.
आयकर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनी मोबाईल कंपनी एमआय आणि ओप्पो आणि इतर अनेक कंपन्यांसह वरिष्ठ अधिकारी, संचालक आणि सीएफओ यांच्यावर छापे टाकण्यात आले आहेत. या चिनी कंपन्यांच्या अनेक उत्पादन युनिट्स, कॉर्पोरेट कार्यालये आणि गोदामांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. या वर्षी ऑगस्टमध्ये गुरुग्राममध्ये चीनी उपकरणे बनवणाऱ्या जेटीईवर आयकर छापा पडला होता. कंपनीच्या भारत प्रमुखाचीही इन्कम टॅक्स विभागाने चौकशी केली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी चौकशीत या कंपन्यांनी विविध प्रकारच्या करांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले होते. मोबाईल फोन, कर्ज अर्ज आणि वाहतूक व्यवसायात गुंतलेल्या अनेक चिनी कंपन्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी अलीकडेच छापे टाकले होते. त्यानंतर आज देशभरात पडलेले छापे म्हणजे मोठी कारवाई असल्याचे मत उद्योग जगतातील जाणकारांनी व्यक्त केले.