मुंबई (प्रतिनिधी): कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारनं मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सेवेतून निलंबित केलं आहे. दरम्यान, सेवेतून निलंबित केलेल्या परमबीर सिंग यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. सिंग यांच्याविरोधात अखिल भारतीय सेवा नियम अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. शिवाय आणखी २८ अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाच्या कारवाईची शिफारस पोलिस महासंचालकांनी केली आहे.
हिवाळी अधिवेशात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. मुंबई पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या प्रस्तावाबाबत अबू आझमी यांनी विधानसभेत लेखी विचारलेल्या प्रश्नाला गृहमंत्री वळसे पाटील यांनी उत्तर दिले आहे. परमबीर सिंग यांच्यासह ३० पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
या गुन्ह्यांच्या निपक्षपतीपणे तपास करण्यासाठी त्यांना सेवेत ठेवणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांनी सरकारला दिला आहे. यामध्ये पाच पोलिस उपायुक्त आणि पाच सहायक आयुक्त दर्जाच्या पोलिसांचा समावेश आहे. याबाबत काय अनियमितता झाली याचा तपशील अहवाल गृह खात्याने मागवला असून अहवालानुसार परमवीर सिंग आणि पराग मणेरे यांचे निलंबन करण्यात आल्याची गृहमंत्र्यांनी माहिती दिली आहे.