
संतोष कोत्रे/लांजा
तालुक्यातील शिरंबवली चव्हाणवाडी येथे सात ते आठ वर्षांच्या नर जातीचा बिबट्या सोमवारी २० डिसेंबर रोजी मृतावस्थेत आढळून आला. या बिबट्याचा उपासमारीने किंवा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याची माहिती वनविभागामार्फत लांजा वनपाल दिलीप आरेकर यांनी दिली.
याबाबत वनपाल दिलीप आरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लांजा तालुक्यातील शिरंबवली चव्हाणवाडी येथील सुरेश लक्ष्मण कोलते यांच्या मालकीच्या जमिनीत नर जातीचा हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. सोमवारी २० रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर वन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
या ठिकाणी रत्नागिरीतील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. या बिबट्यावर शिरंबवली या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर व्ही. क्लेमेट बेन, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी रा. रा. पाटील, लांजा वनपाल दिलीप आरेकर, वनरक्षक विक्रम कुंभार तसेच सागर पाताडे यांनी कार्यवाही पार पाडली.