Wednesday, November 13, 2024
Homeमहत्वाची बातमीविधानसभा अध्यक्ष निवडीवरुन गदारोळ!

विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन गदारोळ!

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार आहे. आज राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल सभागृहात मांडला. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर आपल्याकडे आपण म्हणताय की बहुमताचा आकडा मोठा आहे तर एवढी भिती का आहे. केवळ एक दिवसाचा कालावधी का देण्यात आला. कालावधी कमी करण्याचा नियम आपल्याला बदलता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी म्हटले की, जर रेटून नेणार असाल तर आम्ही कायदेशीर लढाई करणार आहोत. आपल्या आमदारांवर एवढा अविश्वास का आहे, असेही ते म्हणाले.

यावर आमदार नाना पटोले म्हणाले की, घोडेबाजार बंद व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. आपण पहिल्यांदा आपण नियम बदलत आहोत का? या नियम बदलाला आमचा पाठिंबा आहे, असे पटोले म्हणाले.

यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपली बाजून मांडताना बेईमानी हा शब्द वापरला. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. यावर मुनगंटीवार म्हणाले की, बेइमानी हा शब्द का मागे घ्यायचा? त्यांनी घोडेबाजार हा शब्द वापरला. सर्व सदस्यांचा त्यांनी अवमान केला. हा काय घोड्यांचा तबेला आहे का? नानाभाऊ दहा वर्षे भाजपमध्ये राहिलात एवढे संस्कार केले ते तर दाखवा, असे मुनगंटीवार म्हणाले.

नवाब मलिक यावेळी म्हणाले की, क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असा निर्णय घेतला होता. किमान त्यांच्या निर्णयाचा तर आदर करा. मग सर्वांनी आता हरकत घेऊ नका आणि एकमताने मंजूर करा, असे मलिक म्हणाले.

यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, अटलबिहारी वाजपेयी यांनी अध्यक्ष निवडणुकीला व्हीप जारी करण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे सरकार १० दिवसांचा कालावधी एक दिवसावर का आणत आहे. सरकार भीतीपोटी हे सर्व करत आहे, असे फडणवीस म्हणाले. विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रिया संदर्भात आम्हांला हा निर्णय मान्य नाही, त्यामुळे आम्ही सभात्याग करत आहोत. यानंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -