Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीराजकीय

राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईत का बोलवले?

राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईत का बोलवले?

मुंबई : आगामी वर्षात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकताच औरंगाबाद, नाशिक आणि पुण्याचा दौरा केला. या दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यानंतर राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थावर बोलावले आहे. याठिकाणी राज ठाकरे त्यांच्याशी संवाद साधतील. यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकांची रणनीती आखली जाईल.


राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या औरंगाबाद, नाशिक आणि पुणे दौऱ्यात स्थानिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय अंदाज घेतल्यानंतर आता राज ठाकरे स्वत: पालिका निवडणुकांसाठी रणनीती आखण्याची शक्यता आहे.


रुपाली पाटील यांनी मनसेचा राजीनामा दिल्याने राज ठाकरे यांचा पुणे दौरा चांगलाच गाजला होता. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या कोअर कमिटीला बैठकीसाठी बोलावले आहे. रुपाली पाटील यांनी पक्ष सोडताना कोअर कमिटीतील नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती. रुपाली पाटील यांची पुण्यातील लोकप्रियता पाहता त्यांचा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेच्या स्थानिक नेतृत्वाला आणखी बळकट होण्याची गरज आहेत. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी काय चर्चा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रुपाली पाटील यांच्या तक्रारीची दखल घेऊन पुण्यातील संघटनेत काही बदल होणार का, हेदेखील पाहावे लागेल.


तर दुसरीकडे ठाणे आणि नाशिकमध्येही मनसेकडून आगामी निवडणुकांमध्ये मोठा जोर लावला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेने विराट मोर्चा काढला होता. ठाणे आणि नाशिकमध्ये मनसेची राजकीय ताकद मोठी आहे. त्यामुळे राज ठाकरे येथील पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Comments
Add Comment