
मुंबई : महाराष्ट्रात आज १०५ नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. नगरपंचायत निवडणुकीसोबत सांगली, मिरज, कुपवाड, अहमदनगर आणि धुळे महापालिकेतील पोटनिवडणूक देखील होणार आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेसह १५ पंचायत समित्यांची निवडणूक पार पडणार आहे. तर, नगरपालिकेच्या आणि ग्रामपंचायतीच्या काही जागांवर देखील पोटनिवडणूक होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राजकीय आरक्षणाशिवाय ही निवडणूक पार पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचाराच्या फेऱ्या संपल्यानंतर मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे सर्वच पक्ष निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र आले नसल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीसाठी आज मतदान होणार आहे. स्थानिक पातळ्यांवर महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यात सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आल्याने, पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर आघाड्या करण्यावर राजकीय पक्षांनी भर दिला आहे.
राज्यातील मंडणगड, दापोली (रत्नागिरी), कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ (सिंधुदुर्ग), देहू (पुणे), लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी (सातारा), कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ (सांगली), सोलापूरमधील माढा, माळशिरस, महाळूंग-श्रीपूर वैराग, नातेपुते या नगरपंचायतीच्या निवडणुकींकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
तसेच भंडारा जिल्हा परिषदेच्या ३९ जागांसाठी, पंचायत समितीच्या ७९ जागा तर नगर पंचायतीच्या ३९ जागांसाठी तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ४३ जागा, नगर पंचायतीच्या ८९ जागा तर पंचायत समितीच्या ४५ जागांसाठी हे मतदान होत आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणामुळे नगरपंचायतींसह सर्व निवडणुका पुढे ढकलण्याचा ठराव राज्य मंत्रीमंडळाने केला होता, न्यायालयाने मात्र इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला नकार दिल्याने निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या आदेशानुसारच ओबीसी आरक्षण रद्द करुन निवडणूक घेण्याचे जाहीर केले. ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याबाबत आयोगाकडूनही काहीही सूचना न आल्याने ओबीसी वगळता इतर जागांसाठी नियोजनानुसार नगरपंचायत निवडणूक होत आहे.