
बुलढाणा : राज्यात आज नगरपंचायतीच्या निवडणुकांसोबतच ग्रामपंचायतीच्याही पोटनिवडणुका पार पडत आहे. राज्यात शांततेत मतदान सुरू असताना बुलढाण्यातील मतदानाला मात्र, हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. जलंब ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जलंब येथे आज सकाळपासून ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी मतदान सुरू होते. त्यानंतर दोन गटात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर अचानक एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केल्याने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये चार जण जखमी झाले असून यात एका महिलेचा समावेश आहे.
या घटनेनंतर तणाव निर्माण झाला असून गावात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मतदान सुरळीत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.