Monday, July 22, 2024
Homeक्रीडाहिमाचल प्रदेश, तामिळनाडू उपांत्य फेरीत

हिमाचल प्रदेश, तामिळनाडू उपांत्य फेरीत

विजय हजारे वनडे चषक

जयपूर :हिमाचल प्रदेश, तामिळनाडूने विजय हजारे वनडे चषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत हिमाचल प्रदेशने उत्तर प्रदेशवर ५ विकेट आणि २७ चेंडू राखून मात केली. दुसऱ्या लढतीत तामिळनाडूने कर्नाटकवर १५१ धावांनी मोठा विजय मिळवला.

क्वार्टर फायनलमधील पहिल्या सामन्यात उत्तर प्रदेशचे २०७ धावांचे आव्हान हिमाचल प्रदेशने ५ विकेटच्या बदल्यात ४५.३ षटकांत पार केले. सलामीवीर प्रशांत चोप्रासह (९९ धावा) आणि वनडाऊन निखिल गंगटाने (५८ धावा) त्यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यापूर्वी, विनय गेलेतिया (३ विकेट) तसेच सिद्धार्थ शर्मा आणि पंकज जस्वालच्या (प्रत्येकी २ विकेट) अचूक माऱ्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना ५० षटकांत ९ बाद २०७ धावांमध्ये रोखण्यात हिमाचल प्रदेशला यश आले. उत्तर प्रदेशच्या तीन फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या. त्यात रिंकू सिंगने सर्वाधिक ७६ धावा केल्या.

दुसऱ्या सामन्यात तामिळनाडूचे ३५५ धावांचे मोठे आव्हान कर्नाटकला पेलवले नाही. त्यांचा डाव ३९ षटकांत २०३ धावांमध्ये आटोपला. सलामीवीर नारायण जगदीशनसह (१०२ धावा) तिसऱ्या क्रमांकावरील आर. साई किशोर (९९ धावा) तसेच तळातील शाहरूख खान (नाबाद ७९ धावा) तसेच रघुपती सिलांबरसन (४ विकेट) आणि वॉशिंग्टन सुंदर (३ विकेट) विजयाचे शिल्पकार ठरले. कर्नाटकच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. सहा बॅटर्सनी दोन आकडी धावा केल्या तरी सर्वाधिक ४३ धावा श्रीनिवास शरथच्या आहेत. सलामीवीर देवदत्त पडिक्कल (०) आणि कर्णधार मनीष पांडेचे (९ धावा) अपयश कनार्टकला भोवले.

त्यापूर्वी, आघाडी फळी बहरल्याने तामिळनाडूने साडेतीनशेपार मजल मारली. त्यात ओपनर जगदीशनच्या १०१ चेंडूंतील १०२ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याला साई किशोर आणि दिनेश कार्तिकची चांगली साथ लाभली. किशोरने ६१ तसेच कार्तिकने ४४ धावा केल्या. या त्रिकुटाने रचलेल्या मजबूत पायावर सातव्या क्रमांकावरील शाहरूख खानने कळस चढवला. त्याने अवघ्या ३९ चेंडूंत नाबाद ७९ धावा फटकावल्या. त्यात ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे.

विदर्भची बुधवारी लढत

उपांत्यपूर्व फेरीच्या उर्वरित दोन लढतींमध्ये पहिल्या सामन्यात बुधवारी विदर्भची गाठ सौराष्ट्राशी आहे. अन्य लढतीत केरळ आणि सर्व्हिसेस आमनेसामने आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -