मोनिश गायकवाड
भिवंडी :भिवंडी शहर म्हटले की कापड उद्योगनगरी डोळ्यासमोर येते. भिवंडीला देशाचे मँचेस्टर शहर म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून भिवंडी शहरातील कापड उद्योगाला आलेल्या मंदीने कापड उद्योग भिवंडी शहरातून हद्दपार होण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भिवंडी शहराची ओळख कापड उद्योग नगरी म्हणून संपूर्ण जगभरात आहे. भिवंडी शहरात तयार झालेले कापड विविध मोठमोठ्या ब्रँडच्या नावे विक्री केला जातो. मोठ्या प्रमाणात कापड तयार होत असल्याने भिवंडी शहरात मोठमोठी गोदामे आहेत. यामध्ये नावाजलेल्या कंपन्यांची गोदामे आहेत. मग या ठिकाणाहून कापड देशातील व राज्यातील विविध शहरांमध्ये पोहचवले जातात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडी कापड उद्योगाला मंदी आल्याने कापड व्यापारी आता कापड उद्योग सोडून इतर व्यवसायांमध्ये आपली नवीन सुरुवात करत असल्याचे समजते. हे असेच सुरू राहिले तर भिवंडीची कापड नगरी ही ओळख यामुळे पुसली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन भिवंडीच्या कापड उद्योग नगरीला वाचविले पाहिजे, असे येथील उद्योजक आणि कामगारांचे म्हणणे आहे.