पुणे (हिं.स) : आघाडीची औद्योगिक आणि स्वयंचलन पुरवठादार कंपनी शैफलर इंडिया लिमिटेडने प्रो कब्बडी लीगच्या ८ व्या सिझनसाठी पुणेरी पलटणबरोबर सहयोगी प्रायोजक म्हणून प्रायोजकता करार केला आहे. या प्रायोजकतेतंर्गत शैफलरचे दर्शन पुणेरी पलटण संघासाठी “पॉवर्ड बाय” पार्टनर म्हणून होईल आणि कंपनीचा लोगो संघाच्या अधिकृत जर्सीच्या पाठीमागच्या बाजूवर दिसेल.
या भागीदारीबद्दल बोलताना शैफलर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष (औद्योगिक व्यवसाय) हर्षा कदम म्हणाले, “एक खेळ म्हणून कब्बडी हा खेळ कितीही अडथळे आले तरी जिंकण्याची आकांक्षा मनी बाळगणाऱ्या इच्छेचे प्रतिक आहे. शैफलर प्रमाणेच उच्च कामगिरी करण्यासाठी पुणेरी पलटण संघ हाही लवचिकता, चपळता आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या मुल्यांचा अंगीकार करतो. अशा तेजस्वी संघाला पाठबळ देताना आम्हांला अत्यंत आनंद होत असून प्रो कब्बडी लीगचा हा सिझनही खूपच उत्साहवर्धक होईल असा आम्हांला विश्वास आहे.”
शैफलर इंडियाच्या ऑटोमोटीव्ह आफ्टरमार्केटचे अध्यक्ष देबाशिष सत्पथी म्हणाले, “प्रो कब्बडी लीगच्या ८ व्या सिझनसाठी पुणेरी पलटणला अधिक बलशाली करायला आम्हांला खूप आनंद होत आहे. वाढत्या जनपाठबळासह भारतातील लोकप्रिय खेळ बनताना या संघाकडे समृद्ध वारसा आणि निष्ठावान चाहतावर्ग आहे. या सुंदर खेळाच्या प्रचाराबरोबर आमच्या निर्धारित प्रेक्षकवर्गासमोर ब्रँडची लवचिकता उंचावण्यासाठी याची मदत होईल असा आम्हांला विश्वास आहे.”
पुणेरी पलटण संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश कंदपाल म्हणाले, “जागतिक पातळीवर शैफलर मोटरस्पोर्ट संघांबरोबर भागीदारी करत आहे आणि भारतात आगामी प्रो कब्बडी लीगच्या ८ व्या सिझनसाठी पुणेरी पलटणसोबत भागीदारी करण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे मला खूप आनंद झाला आहे. संघाचे प्रायोजक म्हणून या आपल्या घरच्या, आपल्या मातीतल्या खेळाकडे, कब्बडीकडे ते वळत आहेत. कब्बडी हा जलद हालचाल, वेग आणि ताकद यांचा खेळ आहे आणि भारतीय बाजारपेठेतील शैफलरच्या उत्पादनांशी तो सुसंगत आहे.”