Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीप्लास्टिक द्रोण, पत्रावळी जातात जनावरांच्या घशात

प्लास्टिक द्रोण, पत्रावळी जातात जनावरांच्या घशात

जनावरांचे आरोग्य धोक्यात; संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

बोईसर (वार्ताहर) : लग्नसमारंभात तसेच कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगात जेवण करण्यासाठी प्लास्टिकच्या द्रोण, पत्रावळी व ग्लास यांचा वापर सर्रास केला जातो. त्यांचा उपयोग झाल्यानंतर मात्र या वस्तू रस्त्यावर फेकून दिल्या जातात. यावर चिकटलेले अन्न खाण्यासाठी जनावरे गर्दी करतात. त्यामुळे जनावरांच्या पोटात हे द्रोण पत्रावळी जाऊन त्यांचे आरोग्य बिघडत आहे.

अन्न असो किंवा एकीकडे कागदी पत्रावळी वापरण्यासाठी शासनाने आदेश होते. परंतु, ग्रामीण भाग v शहरी भागात सर्रासपणे प्लास्टिकचे आवरण असलेल्या पत्रावळी, द्रोण व ग्लास वापरले जातात. कारण ‘वापरा आणि फेका’ असा सर्वसामान्यांना सहज परवडणारा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक याचा वापर करतात. त्यांचा वापर केल्यानंतर प्लास्टिक कचरा ग्रामीण भागातील नागरिक रस्त्याच्या कडेला राजरोस फेकून देतात. त्या पत्रावळीला अन्न चिकटलेले असते. त्यावर जनावरे तुटून पडतात व ते अन्न खाण्याच्या प्रयत्नात जनावरांच्या घशामध्ये प्लास्टिकचे आवरण चिकटते. त्यामुळे अनेक जनावरांना घशाचे आजार झाल्याचे समजते.

त्याचप्रमाणे बाजारातून नागरिक प्लास्टिकच्या थैलीमध्ये खाद्यपदार्थ विकत घेतात व त्यासुद्धा घराच्या बाहेर फेकून देतात. त्यावरसुद्धा जनावरे ताव मारतात. श्वानसुद्धा प्लास्टिकच्या पन्नीवर ताव मारत असल्याचे विदारक चित्र दृष्टीस पडते. एकीकडे चाऱ्याअभावी जनावरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे विविध आजारांनीसुद्धा जनावरांची संख्या रोडावत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पशुप्रेमींकडून केली जात आहे.

विल्हेवाट लावण्याकडे दुर्लक्ष

ग्रामीण किंवा शहरी भागात नागरिक विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. मात्र, यानिमित्त जेवण व अल्पोपहारासाठी प्लास्टिकच्या द्रोण, पत्रावळी व ग्लासचा वापर सर्रासपणे करतात. मात्र, वापरल्यानंतर त्या प्लास्टिकच्या पत्रावळी, द्रोण व ग्लास गोळा करून त्यांची विल्हेवाट न लावता सर्रास रस्त्याच्या कडेस टाकतात. त्यामुळे मोकाट जनावरे भूक मिटवण्यासाठी यावर ताव मारतात. त्यामुळे जनावरांना आजाराला सामोरे जावे लागतात. नागरिकांनी आपली जबाबदारी समजून त्या प्लास्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

प्लास्टिकवर बंदी नावापुरतीच?

शासनाने प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी लावली आहे. मात्र, दुकानदार किंवा नागरिक मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या थैली, पत्रावळी, द्रोण व ग्लासचा वापर करतात. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळेच प्लास्टिक वस्तूंचा वापर सर्रासपणे नागरिक करत आहे. त्यामुळे प्लास्टिकवर बंदी केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र दिसून येते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -