कोहलीचा वाद क्रिकेटला घातक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली आणि कसोटी कर्णधार विराट कोहली यांच्यातील वाद सध्या चर्चेचा विषय आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपपूर्वी या प्रकारातील नेतृत्व सोडण्याचा निर्णय विराटने घेतला. फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्याने तेव्हा तरी सांगितले. पुढे कोहलीकडे कसोटीची धुरा कायम ठेवताना वनडे प्रकारातील कर्णधारपदही काढून घेण्यात आले. त्यामुळे झटपट क्रिकेटसाठी मुंबईकर रोहित शर्माच्या रूपाने भारताला नवा कर्णधार मिळाला. २०२३ मध्ये वनडे वर्ल्डकप होणार आहे. त्या आधी नव्या कर्णधाराला स्थिरावण्यास वेळ मिळावा म्हणून विराटकडून जबाबदारी काढून घेण्यात आली, असे बीसीसीआयच्या राष्ट्रीय निवड समितीचे म्हणणे आहे.

मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी विराट कोहलीने प्रसारमाध्यमांसमोर त्याचे मन मोकळे केले आणि वादाला तोंड फुटले. कसोटी संघाची घोषणा होण्याआधी दीड तास आधी मला वन-डे कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कसोटी संघाच्या निवडीबाबत चर्चा केल्यानंतर, यापुढे तू वनडे संघाचा कॅप्टन नसशील, असे निवड समिती सदस्यांनी मला सांगितले. हा निर्णय घेताना माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे विराटने स्पष्ट केले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांचे म्हणणे आहे की, टी-ट्वेन्टी कर्णधारपद सोडू नकोस.

मात्र, भारताच्या कसोटी कर्णधाराने दादाचा हा दावाही खोडून काढला आहे. टी-ट्वेन्टी प्रकारातील कॅप्टन्सी सोडू नकोस, असे मला कुणीही म्हटलेले नाही. एक पुरोगामी पाऊल म्हणून स्वीकारत योग्य दिशेने टाकलेले पाऊल, अशी बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांची त्या वेळची प्रतिक्रिया होती, असे कोहलीने सांगितले. मला वनडे कर्णधार पदावरून काढून टाकण्यामागे आयसीसी पुरस्कृत एकही स्पर्धा न जिंकण्याचे कारण आहे, असेही कोहलीला वाटते. कोहलीच्या खुलाशानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका मुलाखतीत रोहित शर्माची तातडीने कर्णधारपदी नियुक्ती का करण्यात आली, याबाबत बोर्डाची भूमिका मांडली. विराटने एकदा ठरवले की, त्याला टी-ट्वेन्टी कर्णधारपद नको आहे. त्यानंतर रोहित शर्मा योग्य पर्याय होता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी पाच जेतेपदे, डेक्कन चार्जर्ससह एक विजेतेपद मिळवणे हे त्याची क्षमता दाखवण्यासाठी पुरेसे आहे. न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका ३-० अशी जिंकूनही त्याने आश्वासक सुरुवात केली आहे, असे गांगुली म्हणाले.

२०१७ मध्ये विराटकडे कर्णधारपद आले. त्याच्या नेतृत्वाखालील भारताने ६५ सामने खेळताना ३८ विजय मिळवले, तर १६ सामन्यांत पराभव पाहावा लागला. ११ सामने अनिर्णीत राहिले. एकूण विजयांपैकी मायदेशातील २३ आणि परदेशातील १५ विजयांचा समावेश आहे. झटपट क्रिकेटमधील यशापयशाचा विचार करता वनडेत ९५ सामन्यांमध्ये भारताने ६५ जिंकलेत. २७ सामन्यांत पराभव झाला. त्यात मायदेशातील ३५ सामन्यांत २४ विजय आणि १० पराभवांचा समावेश आहे. परदेशात हेच समीकरण ४२ सामन्यांत २९ विजय आणि ११ पराभव असे आहे. विराटच्या नेतृत्वाखाली सांघिक कामगिरी चांगली झाली तरी आयसीसी स्पर्धा न जिंकल्याची खंत आहे. कोहलीच्या कॅप्टन्सीमध्ये २०१७ आयसीसी चम्पियन्स ट्रॉफीमध्ये फायनलमध्ये पराभव झाला. २०१९ वनडे वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीतच आव्हान संपुष्टात आले. याच वर्षी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध हार पत्करावी लागली. यूएईत झालेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये गटवार साखळीतच बाहेर पडावे लागले. त्यात परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाचा समावेश आहे.

विराट आणि वाद हा काही नवा विषय नाही. तो खेळाप्रमाणेच वागण्यातही अग्रेसिव्ह आहे. मात्र कालानुरूप किंवा तुमच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी आल्यानंतर स्वभावाला मुरड घालावी लागते. त्यातच तुम्ही लीडर असता आणि अन्य सहकारी तुमचे अनुकरण करत असतात. विराट कोहली आणि माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. दोघे सहा महिने बोलतच नव्हते. मात्र रवी शास्त्री यांच्याशी त्याने जुळवून घेतले. आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याशी कोहलीने पंगा घेतला आहे. त्यात कोण खरे बोलतोय आणि कोण खोटे, याचा उलगडा होणे कठीण आहे. मात्र अशा मैदानाबाहेरील वादांमुळे विद्यमान क्रिकेटपटूंचे लक्ष विचलित होऊ शकते. त्याचा परिणाम सांघिक कामगिरीवर होऊ शकतो.

कर्णधारपद हा काटेरी मुकुट आहे. अनेक महान क्रिकेटपटू यशस्वी कॅप्टन बनू शकलेले नाहीत. कधी त्यांचा फॉर्म, तर कधी अन्य सहकाऱ्यांची कामगिरी त्यांच्या नेतृत्वाखालील अपयशाला कारणीभूत ठरली आहे. झटपट क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून आलेले अपयश विसरून विराट कोहलीने भविष्यात भारताला आयसीसी स्पर्धा जिंकून देण्यासाठी शंभर टक्के योगदान द्यायला हवे. विराट हा सद्यस्थितीत भारताचा एक सीनियर क्रिकेटपटू आहे. २००८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या या दिल्लीकराची कारकीर्द जवळपास १३ वर्षांची आहे. ही कारकीर्द छोटी नाही. या कालावधीत विराटने ९७ कसोटी सामन्यांत ५०.६६च्या सरासरीने ७८०१ तसेच वनडेत २५४ सामन्यांत ५९.०७च्या सरासरीने १२,१६९ धावा ठोकल्या आहेत. कसोटीत २७ आणि वनडेत ४३ शतके त्याच्या नावावर आहेत. वनडे प्रकारात विक्रमवीर सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक सेंच्युरी त्याच्याच नावावर आहेत. फॉर्म आणि फिटनेस राखल्यास कोहली क्रिकेटमध्ये आणखी मजल मारू शकतो. त्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करावे, असे त्याच्या चाहत्यांना वाटते.
Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या