
कल्याण (वार्ताहर) : चित्र म्हणजे दृकभाष्य शब्दा विना साधलेला संवाद. असाच संवाद चित्र रसीकांसाठी अनुभूती या समूह चित्र प्रदर्शनातून चित्रकार जयवंत वाघेरे (वाडा), चित्रकार प्रकाश काकड (कल्याण), ऋषभ झाला (ठाणे) व पालघर येथील धिरज पाटील या चित्रकांनी साधला आहे. रंग, आकार यातून आशयाची अनुभूती साकारली आहे. मुंबईतील नेहरू सेंटर येथे हे चित्र प्रदर्शन भरविण्यात आले असून मंगळवारपासून या चित्रप्रदर्शनाला सुरवात झाली आहे. २७ डिसेंबरपर्यंत हे चित्र प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असेल.
निसर्गचित्र, रचनाचित्र व अमूर्तचित्र या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. निसर्गाच्या विविध रुपात बदलणाऱ्या रंग छटांची अनुभूती चित्रकार जयवंत वाघेरे व प्रकाश काकड यांच्या चित्रातून साकारली आहे. तर मानवी भावविश्वाच्या सुंदर अवस्थांची अनुभूती चित्रकार धिरज पाटील यांच्या रचनाचित्रातून साकारली आहे. चित्रकार ऋषभ झाला यांनी त्यांच्या मनातील आशयाचे अमूर्त चित्रे साकारली आहेत.