
सोनू शिंदे
उल्हासनगर :वर्ष २०१७ पासून आजपर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक कामे केली. याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी वेंगुर्ले गावाचा अभ्यास करून, बोध घ्यावा व स्थानिक विकासकार्य घडवून आणले पाहिजे असे मत भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ते वेंगुर्ले गावात पत्रकारांशी बोलत होते. आमदार रवींद्र चव्हाण हे वेंगुर्ले नगर परिषद येथील नाटककार मधुसुदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह मधील कवी आरती प्रभू रंगमंचाच्या नुकत्याच झालेल्या लोकार्पण सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थितीत होते. या रंगमंचाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले.
या सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप, स्थानिक नगरसेवक प्रशांत आपटे, उल्हासनगरचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी, कपिल अडसूळ तसेच अन्य मान्यवर मंचावर उपस्थितीत होते. रवींद्र चव्हाण म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीचे प्रशासन व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी राजकारण करण्यापेक्षा वेंगुर्ले नगरपरिषदेसारखे विकास कार्य घडवून आणले पाहिजे.
या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वेंगुर्ले नगराध्यक्ष गिरप यांचे कौतुक करत, कोकणी माणसाने आपला एक उद्योग सुरू करावा असा सल्ला दिला.