मुंबई / दिसपूर (हिं.स.) : पेट्रोल आणि डिझेलला पर्यावरणपूरक पर्याय ठरणारा बांबूपासून इथेनॉल निर्मितीचा हा जगातील पहिला रिफायनरी प्रकल्प ही देशासाठी सर्वात मोठी उपलब्धी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि सन २०१७ च्या ऐतिहासिक निर्णयाचा हा परिपाक आहे. त्यांनी त्यावर्षी बांबू या जातीला वृक्षातून काढून गवत या वर्गात समावेश केला. त्यामुळे बांबू तोडण्या- कापण्यासाठी वृक्षाप्रमाणे परवानगी लागत नाही. त्यामुळे बांबू वापराचा मार्ग सुकर झाला आहे. बांबू पासून इथेनॉल निर्मितीच्या या प्रकल्पामुळे बांबूसाठी मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे. परिणामी शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे. शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध होतो, असे स्पष्ट करून साखर कारखान्याच्या धर्तीवर बांबू लागवड आणि तोडणीचा काळ याबाबतचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यासह या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही यावेळी पाशा पटेल यांनी दिली.
आसाममधील नुमालिगड येथे भारत सरकार, नेदरलँड आणि फिनलँड यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या बांबूपासून इथेनॉल निर्मितीच्या जगातील पहिल्या रिफायनरी प्रकल्पाला देशभर बांबू लागवडीची चळवळ उभारणारे पाशा पटेल यांनी नुकतीच भेट देऊन माहिती जाणून घेतली आणि बांबू लागवड – व्यवस्थापन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल, दगडी कोळशामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेले प्रदूषण विचारात घेता त्याऐवजी जैव भाराचा वापर करण्यावर केंद्रातील मोदी सरकार भर देत आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय इथेनॉलचा वापर पर्यावरण संरक्षणासाठी अतिशय फायदेशीर ठरणारा आहे. त्या अनुषंगानेच भारत सरकार, फिनलँड, नेदरलँड यांच्या संयुक्त सहकार्याने आसाम राज्यातील नुमालिगड येथे “आसाम बायो रिफायनरी प्रा. लि.” या नावाने बांबूपासून इथेनॉल निर्मितीचा जगातील पहिला प्रकल्प उभा राहतो आहे. ऑगस्ट २०२२ पर्यंत हा प्रकल्प सुरू होणार असून, या ठिकाणी वर्षाकाठी ६ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होणार आहे. या प्रकल्पाकरिता ५ लाख टन बांबू लागणार आहे. ३ हजार कोटी रुपये खर्चाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आसाम हे देशातील जास्त बांबू लागवड करणारे राज्य असल्याने या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीसाठी या राज्यातील या जागेची निवड करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा बांबू लागवडीसाठी देशभर चळवळ उभारून जनजागृतीच्यादृष्टीने एक हजारावर सभा घेऊन मार्गदर्शन करणारे पर्यावरण अभ्यासक पाशा पटेल यांनी या चळवळीतील त्यांचे सहकारी संजय करपे यांच्यासह आसाम रिफायनरी प्रकल्पाला भेट दिली. प्रारंभी या रिफायनरीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक भास्कर फुकन यांनी पाशा पटेल यांचे स्वागत करून त्यानंतर या प्रकल्पाबाबतचे सविस्तर प्रेझेन्टेशन सादर करताना प्रकल्पाची सद्यस्थिती, कसे काम होत आहे, कोणते तंत्रज्ञान वापरले जात आहे आणि किती बांबू लागणार याबाबतची माहिती दिली. आसाम हे जास्त बांबू लागवड करणारे राज्य असल्याने रिफायनरीसाठी राज्यातील जागेची निवड करण्यात आल्याचे श्री. फुकर यांनी सांगितले. यानंतर फुकन यांच्यासमवेत पाशा पटेल यांनी काम सुरू असलेल्या या रिफायनरीला भेट देऊन माहिती जाणून घेतली.
शेवटी प्रकल्पस्थळी पाशा पटेल आणि चेअरमन फुकन यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चासत्र पार पडले. याप्रसंगी रिफायनरी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप बरूआ, सर्व विभागांचे प्रमुख यांच्यासह आसाममधील अग्रगण्य बांबू पुरवठादार अटालू बोरा, टाटा ग्रुपचे अंबरनिल भारद्वाज, देशातील अग्रगण्य क्राफ्टींग या बांबू ब्रँडचे प्रमुख परीक्षित बोरकोटॉय, किसान संघटनेचे लानु, एफपीओचे रितेश, मुख्य प्रतिनिधी मिसेस कश्मिरी गोस्वामी, नागालँडच्या थर्मल पावरचे प्रमुख आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी पाशा पटेल यांनी देशासाठी बांबूपासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प किती महत्वाचा आहे, यावर मार्गदर्शन केले आणि देशभर लागवडीबाबत सुरू असलेल्या चळवळीची माहिती दिली. महाराष्ट्रातही बांबू पासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.
रिफायनरी प्रकल्पाचे चेअरमन भास्कर फूकन म्हणाले की, पाशा पटेल यांच्या भेटीमुळे आमच्या लोकांना ऊर्जा मिळाली. आता खऱ्या अर्थाने काम करण्याचे समाधान आम्हाला लागणार असून, यापुढेही पाशा पटेल यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.