सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातून आंब्याची पहिली पेटी पाठवण्याचा मान कुणकेश्वर-वाळकेवाडी येथील उपक्रमशील आंबा बागायतदार अरविंद सीताराम वाळके यांनी प्राप्त केला आहे.
अरविंद वाळके यांनी देवगड हापुसच्या पाच डझनाच्या पाच पेट्या दि. १९ डिसेंबर रोजी नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटला विक्रीसाठी पाठविल्या. यातील प्रत्येक आंबा २७५ ग्रॅम ते ३०० ग्रॅम या वजनातील आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात शेवटचा पाऊस पडला. या प्रतिकूल परिस्थितीतही झाडांची योग्य निगा राखून पिक घेणे हे खरंतर अवघड काम. पण या परिस्थितीवरही मात करुन वाळके यांनी हापुसचे उत्पादन घेतले आहे. हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीत आंबा मोहर टिकवून उत्पादन मिळवण्याची किमया त्यांनी गेली सहा वर्षे केली आहे.
वाळके यांनी आंबा विक्रीस पाठवण्याचा शुभारंभ केला यावेळी प्रगतशील आंबा बागायतदार अजित वाळके, रावजी वाळके, भरत वाळके, मयूर वाळके व परिवार उपस्थित होता. वाळके यांच्या हापूस आंबा बागेतील दहा कलमांच्या झाडावर जुलै महिन्याच्या अखेरीस मोहोर आला होता. आलेला मोहर टिकवणे ही खरी कसरत होती. त्यासाठी त्यांनी पावसाचा हंगाम असतानाही औषधांची फवारणी केली. मोहरावर बुरशीचा उपद्रव होऊ नये यासाठी त्यांना बुरशीनाशकांची फवारणी जास्त प्रमाणात करावी लागली. तसेच सुरुवातीचे आंबा फळ टिकविण्यासाठी व त्याची गळ थांबवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यात आली. झाडाला पूर्णतः सेंद्रिय खतांचा वापर करण्यात आला होता. कोणत्याही प्रकारे नवसंजीवकांचा वापर करण्यात आला नाही. त्यामुळे प्राप्त आंब्याची प्रतवारी उत्कृष्ट झाल्याची माहिती वाळके यांनी दिली.
नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केट मधील कंपनीच्या माध्यमातून या फळांची विक्री होणार आहे. तसेच वाळके यांनी एएसडब्ल्यू या नावाने ब्रँड तयार केला आहे. निश्चितच हंगामापूर्वी झालेल्या आंब्याला चांगला दर मिळेल. बदलत्या हवामानामुळे व अवेळी पडणाऱ्या पावसामुळे आंबा बागायतदारांचे गेल्या चार-पाच वर्षात मोठे नुकसान झाले आहे. आंबा बागायतदारांना पिक विमा काढून सुद्धा योग्य भरपाई देण्यात येत नाही. विभागांमध्ये उभारण्यात आलेले हवामान केंद्राच्या योग्य नोंदी उपलब्ध होत नसल्यामुळे नुकसान भरपाई सुद्धा योग्य प्रकारे मिळत नाही, असे वाळके यांनी सांगितले.