नाशिक : जिल्ह्यामध्ये थंडीची तीव्रता वाढत आहे. सोमवारी सकाळी जिल्ह्याचे तापमान ११.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. थंडीमुळे नाशिककर गारठून गेले असून या थंडीचा आनंदही अनेक नागरिक घेताना दिसत आहेत. जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमान निफाडमध्ये नोंदविण्यात आले आहे.बदलत्या हवामानामुळे जिल्ह्यातील द्राक्षांची पंढरी पूर्णपणे अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उत्तर भारतामध्ये थंडीची लाट निर्माण झाल्याने त्याचा परिणाम हा उत्तर महाराष्ट्रावर देखील होत असून उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर थंडीची तीव्रता वाढत आहे.उत्तर महाराष्ट्रातील धुळे येथे ५.५ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तर त्याखालोखाल जळगाव येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसांपासून सातत्याने पारा रोज घसरत आहे. जिल्ह्यामध्ये देखील थंडीची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून दोन दिवसांमध्ये तापमान हे चार अंश सेल्सिअसने कमी होऊन सोमवारी सकाळी ११.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे. थंडीची तीव्रता वाढल्यामुळे शहरातील नागरिकांनी वेगवेगळ्या मैदानांवर व्यायाम करण्यासाठी तसेच जॉगिंगसाठी गर्दी केली आहे. तर जागोजागी शेकोट्या देखील पेटविण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तापमान निफाडमध्ये नोंदविण्यात आले असून निफाडमध्ये सोमवारी सकाळी ८.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. तर दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. यापूर्वी झालेला बेमोसमी पाऊस आणि वाढती थंडी यामुळे द्राक्षाची पंढरी असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक द्राक्ष वाचविण्यासाठी आता धावपळ करीत आहे.
थंडीत वाढ झाल्यामुळे द्राक्षाच्या घडांवर भुरी नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी बेमोसमी पावसामुळे डावणी या रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात द्राक्षावर झाला होता. त्यातून शेतकऱ्यांनी कशीबशी द्राक्ष वाचविली. मात्र आता अचानक थंडीची लाट वाढल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे व थंडीपासून रक्षण करण्यासाठी आता शेतकरी शेकोट्या पेटवून द्राक्ष वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. या भागात थंडीचा रब्बी पिकांना मात्र चांगला फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर नाशिक जिल्ह्यातील वाढती थंडी लक्षात घेऊन नागरिकांनी आता उबदार कपडे खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे.