आरोग्य भरती, म्हाडा आणि शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यांच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार, घोटाळा आणि भ्रष्टाचाराची रोज नवनवीन माहिती उजेडात येत आहे. जर कुंपणच शेत खात असेल, तर तक्रार तरी कोणाकडे करायची? स्पर्धा परीक्षांचे आणि पात्रता प्रवेश परीक्षांचे पेपर फुटतातच कसे? महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यापासून पेपरफुटीच्या घटना पाठोपाठ का घडत आहेत? ठाकरे सरकारचा प्रशासनावर वचक नाही आणि पेपरफुटीमुळे हजारो विद्यार्थांचे जे नुकसान होत आहे, त्याविषयी मुळीच गांभीर्य नाही. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने सखोल व वेगाने तपास करून पेपरफुटीमागचे सूत्रधार शोधून काढले; पण त्यामुळे पेपर फोडणारे लोक प्रशासनातीलच आहेत, हे उघडकीस आले. पेपर फोडणे आणि ते विकून कमाई करणे, हा अधिकारी व दलालांचा धंदा झाला आहे. इतके दिवस कोण कोणाला संरक्षण देत होते, हेही पुढे येणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांना कोण वाचवत होते?
पुणे पोलिसांनी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम नामदेव सुपे आणि शिक्षण विभागातील तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर या दोघांना अटक केली आहे. जसे गृहखात्याच्या शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणी सचिव वाझेला अटक झाल्यानंतर अनेक दिग्गजांची नावे पुढे आली, तसे पेपरफुटी प्रकरणात परीक्षा आयुक्तांना अटक झाल्यानंतर अनेक मोठी नावे पुढे आली, तर आश्चर्य वाटायला नको. आरोग्य भरती परीक्षेचा पेपर फुटल्यावर राज्यात त्याचा मोठा आरडा-ओरडा झाला. त्याचा तपास चालू असतानाच म्हाडा परीक्षेचा पेपर फुटला. त्यापाठोपाठ टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार बाहेर आला. म्हाडा पेपरफुटी प्रकरणी गृहनिर्माण मंत्र्यांनी जाहीर माफी मागितली व दुःख व्यक्त केले. म्हाडा पेपरफुटी प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करू, असे सांगितले. मग टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी आता कोण माफी मागणार आहे? म्हाडा पेपरफुटी प्रकरणी परीक्षेचे काम बघणाऱ्या साॅफ्टवेअर कंपनीच्या संचालकांना व दोघा एजंटना पोलिसांनी अटक केल्यावर टीईटी परीक्षेतही गैरव्यवहार चालू असल्याचे समजले. पेपर विकून पैसे कमावणारी टोळी असल्याचा त्यातून सुगावा लागला. संगनमताने टीईटी पात्र करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सर्रास पैसे घेतले गेल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
विशेष म्हणजे, परीक्षा आयुक्तांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली, तेव्हा ८८ लाख ४९ हजार रुपये रोख रक्कम मिळाली. एवढी रोकड त्यांच्या घरी कुठून आली? टीईटी परीक्षेत पात्र ठरविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून पस्तीस हजार ते एक लाख रुपये घेतल्याची माहिती पुढे आली आहे. हे पैसे सर्वांनी वाटून घेतले. पुणे पोलिसांनी ज्या तडफेने पेपरफुटीचा तपास केला, त्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे; पण हे सर्व घडत असताना कोणालाच कशी माहिती मिळाली नाही, याचे मोठे आश्चर्य वाटते. तीन परीक्षांच्या पेपरफुटीने सारा महाराष्ट्र हादरला, पण महाविकास आघाडी सरकारला त्याचे काहीच वाटले नाही. आरोग्य खाते, म्हाडा व टीईटी अशा तीन परीक्षांमधील घोटाळ्यात दोन डझन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याचा अर्थ पेपर फोडणे व विद्यार्थांना पात्र ठरवणे, या मालिकेत बरेच जण गुंतलेले होते. तरीही इतके दिवस सारे बिनबोभाट काम चालू होते. १ डिसेंबरला आरोग्य भरती घोटाळ्यातील पहिल्या आरोपीला अटक झाली. त्याच्याकडे म्हाडामधील पेपर फुटणार असल्याची माहिती होती. विशेष म्हणजे, आरोग्य विभागाच्या पेपरफुटीमध्ये पकडलेल्या लोकांकडेच म्हाडाची परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे मिळाली. पुढे म्हाडा परीक्षा घोटाळ्याची चौकशी करताना म्हाडा आरोपींच्या घरात टीईटी विद्यार्थ्यांची कागदपत्रे मिळाली. त्यातूनच पुढे परीक्षा आयुक्तांना व अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली.
ज्या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते, त्या कंपनीला ओएमआर शीट स्कॅनिंगचे काम परत कसे दिले गेले? ज्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांना उत्तरपत्रिका भरू नका, असे कोणी सांगितले. उत्तरपत्रिका फेरतपासणीसाठी अर्ज करा, असा सल्ला कोणी दिला, फेरतपासणीसाठी अर्ज आल्यावर उत्तरपत्रिकेवर कोणी गुण वाढवून दिले? अशा अनेक प्रश्नांचा पोलिसांना छडा लावावा लागेल. पेपरफुटी प्रकरणात व विद्यार्थांना गुणवाढ करून देण्यात एक टोळी कार्यरत आहे किंवा ठरावीक गँग सामील आहे, याची माहिती प्रशासनातील उच्चपदस्थांना नक्की असणार. मग ते सर्व घोटाळा बाहेर येईपर्यंत गप्प का बसले होते? त्यांचे तोंड बंद ठेवण्यामागे कोण होते? त्यांच्यावर वरून दडपण होते की, ते कोणाच्या दबावाखाली तोंडाला पट्टी लावून बसले होते?
आरोग्य विभाग, म्हाडा किंवा टीईटी या तीनही परीक्षा महत्त्वाच्या आहेत. नोकरीत प्रवेश घेण्यासाठी त्या आवश्यक आहेत. सरकारी व निमसरकारी नोकरीचे लाभ मोठे आहेत, म्हणूनच या भरतीकडे सुशिक्षित तरुण मुलांचा मोठा ओढा आहे. गेल्या काही वर्षांत अशा परीक्षा घेण्याचे काम खासगी कंपन्यांवर सोपवले जात आहे. त्यातच घोटाळा होतो व प्रशासनातील बाबूंना नामानिराळे राहता येते. नियमांचे उल्लंघन करून आणि पुरेशी साधनसामग्री नसताना अशा परीक्षांचे आयोजन केले जाते, त्यात विद्यार्थ्यांची ससेहोलपट होते. पेपरफुटीत अडकलेले लोक नव्या पिढीचे मारेकरी आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ते खेळ करीत होते. अशांना कायमची जरब बसावी, अशी अद्दल घडवणे आवश्यक आहे.