Thursday, October 10, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमुंबई महापालिका निवडणूक दुरंगी

मुंबई महापालिका निवडणूक दुरंगी

सीमा दाते

सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेली मुंबई महापालिका निवडणूक फेब्रुवारीत अपेक्षित आहे. त्यामुळे सगळेच पक्ष अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यातच सत्ताधारी पक्ष मात्र जोरदार तयारीत आहे. मुंबई महापालिका आपल्या हातून जाऊ नये म्हणून मोठं-मोठे प्रस्ताव आणून मुंबईकरांना खूश करत असल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे, निवडणूक फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित असली तरी निवडणुकीची तारीख पुढे जाण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्य सरकारकडून अधिसूचना मिळाल्यानंतर महापालिकेने प्रभागांच्या फेररचनेचा आराखडा तयार करण्यास तयारी केली आहे; मात्र त्यानंतरही सूचना आणि हरकती मागावण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे निवडणूक पुढे जाण्याची शक्यता असल्याचं राजकीय पक्षांचं म्हणणं आहे. असं जरी असलं तरी, राजकीय पक्षांना मात्र मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. सत्ताधारी पक्षाने तर आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या चार दशकांपासून मुंबईत महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांनी रस्त्यांच्या कामांचा जितका धसका घेतला नसेल तितका धसका आता घेतलाय की, काय असे वाटत आहे. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांच्या कामांचे कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर आणले आहेत. गेली अनेक वर्षे दर पावसाळ्यात मुंबईकरांनी, रस्त्यांची दुरवस्था, खड्डे यांचा त्रास सहन केला; मात्र आता निवडणुकीआधी या कामांचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांनी आणला आहे. त्यामुळे महापालिकेतही याबाबत चर्चा सुरू आहे. निवडणुकीचे बिगुल अद्यापही वाजले नसले तरीही अंतर्गत तयारी राजकीय पक्षांची सुरू आहे.

विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेची येणारी निवडणूक ही दुरंगी होईल, असेच दिसते. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधली ही निवडणूक होईल, अशी चिन्हं असून दोघांमध्ये महापालिका ताब्यात घेण्यासाठी युद्ध रंगणार आहे, असेच वाटत आहे. कारण इतर पक्षांमध्ये सध्या शांतता पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा विचार केल्यास शिवसेनेने आपल्या विभागांत आणि शाखानिहाय कामे करण्यास सुरुवात केली आहे. भाजपने देखील कार्यकर्त्यांचे संघटन करण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नाही तर, मुंबई महापालिकेतील अनेक घोटाळे भाजप मुंबईकरांच्या समोर आणत आहेत, तर मनसेने देखील काही विभागांत आपली तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा सुरू होती; त्यामुळे जर भाजप आणि मनसे यांनी अंतर्गत युती केल्यास याचा फटका शिवसेनेला पडू शकतो. मनसेकडून विभाग कार्यकर्त्यांना विविध सूचना दिल्या असून विभाग पातळ्यांवर कार्यकर्त्यांकडून कामे सुरू झाली आहेत, त्यामुळं शिवसेनेला हरवण्यासाठी भाजप-मनसेअंतर्गत युती होऊ शकते.

दुसरीकडे, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष मात्र अजूनही तयारीत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात जरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असली तरी मुंबई महापालिका निवडणुकीत हे तीन ही पक्ष वेगवेगळे लढण्याच्या तयारीत आहेत. मात्र असं असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत नाही, विशेष म्हणजे महाविकास आघाडी झाल्यानंतर मुंबई महापालिकेतही अनेक प्रस्तावावर त्यांचे एकमत होत आहे. त्यामुळे महापालिकेत युती नसली तरी अंतर्गत विचारांमध्ये मात्र एकमत होत असते. जिथे शिवसेना, भाजप आणि मनसेने तयारीला सुरुवात केली आहे. तिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मागेच असल्याचं पाहायला मिळत आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीनंतर सध्याचे पक्षीय बलाबल पाहता शिवसेना ९९, भाजप ८३, काँग्रेस ३० आणि राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागणार आहे. महापालिका निवडणूक जर स्वबळावर लढायचा विचार हे दोन पक्ष करणार असतील, तर मात्र अवघड आहे. स्वबळावर लढून शिवसेनेचे ९९, तर भाजपचे ८३ नगरसेवक आहेत. म्हणजेच दोघांमधील फरक अवघ्या बोटांवर मोजता येतील इतकीच आहे. त्यातच भाजप-मनसेअंतर्गत युतीची चर्चा सुरू आहे. असे झाल्यास भाजपला नगरसेवक संख्या वाढवता येईल हे नक्कीच; मात्र राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जास्त मेहनत करावी लागणार आहे. मात्र आताचा विचार करता शिवसेना आणि भाजप मात्र जोरदार तयारीत आहेत. एकीकडे पुन्हा एकदा ओमायक्रॉनची आणि निर्बंधाची भीती आहे, त्यामुळे निवडणूक कधी होणार? ही चिंता राजकीय पक्षांना आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -