
मुंबई : टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपेकडे मोठे घबाड सापडल्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. पाटील म्हणाले की, ‘एकीकडे परीक्षांमध्ये घोळ करायचा आणि दुसरीकडे कोट्यवधींची संपत्ती जमा करायची. तुकाराम सुपे याच्यावर मविआ सरकारचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य होणार नाही. लाखो मुलांच्या आयुष्यासोबत खेळताना, त्यांच्या भविष्याचे वाटोळे करताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही’.
तसेच,‘परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि हे लोक लुटारू सत्ताधाऱ्यांसोबत मिळून आपले खिसे भरत सुटले आहेत. अधिकाऱ्यांना हाताशी धरून ‘मविआ’ सरकार अनेक विभागात पैसे खात सुटले आहे. यांना भस्म्या झाला आहे का? या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी व्हायलाच हवी’, अशी देखील मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.