Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीगुजरातमध्ये पाकिस्तानी मासेमारी बोटीत तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉईन सापडले

गुजरातमध्ये पाकिस्तानी मासेमारी बोटीत तब्बल ४०० कोटी रुपयांचे हेरॉईन सापडले

कच्छ : गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी मासेमारी बोट पकडण्यात आली आहे. या बोटीमधून तब्बल ४०० कोटी रुपये किमतीचे ७७ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. ‘अल हुसेनी’ नावाच्या या बोटीमध्ये सहा क्रू सदस्य होते. ही बोट भारतीय जलक्षेत्रात पकडण्यात आली आहे, अशी माहिती संरक्षण जनसंपर्क कार्यालयाने आज दिली. भारतीय तटरक्षक दलाने गुजरात दहशतवादविरोधी पथकासह संयुक्तरित्या ही कारवाई केली.

“भारतीय तटरक्षक दलाने, गुजरात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) सोबत केलेल्या संयुक्त कारवाईत, सुमारे ४०० कोटी रुपये किमतीचे ७७ किलो हेरॉईन घेऊन जाणारी पाकिस्तानी मासेमारी नौका ‘अल हुसेनी’ भारतीय जलक्षेत्रात ६ कर्मचार्‍यांसह पकडली,” अशी माहिती पीआरओ डिफेन्स गुजरातने एका ट्वीटमध्ये दिली आहे.

पुढील तपासासाठी ही बोट गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ किनारपट्टीवर आणण्यात आली होती, असे त्यात म्हटले आहे.

या वर्षी एप्रिलमध्ये, तटरक्षक दल आणि एटीएसने अशीच कारवाई केली होती आणि कच्छमधील जाखाऊ किनार्‍याजवळील भारतीय पाण्यावरून आठ पाकिस्तानी नागरिकांसह आणि सुमारे १५० कोटी रुपये किमतीचे ३० किलो हेरॉईन असलेली बोट पकडली होती.

तर, गेल्या महिन्यात एटीएसने गुजरातच्या मोरबी जिल्ह्यातील एका बांधकामाधीन घरातून सुमारे ६०० कोटी रुपयांचे हेरॉईन ड्रग्जची खेप जप्त केली होती. पाकिस्तानी ड्रग्ज विक्रेत्यांनी ही खेप अरबी समुद्रमार्गे त्यांच्या भारतीय समकक्षांना पाठवली होती, असे एटीएसने म्हटले होते.

या वर्षी सप्टेंबरमध्ये, कच्छमधील मुंद्रा बंदरात भारतातील सर्वात मोठ्या हेरॉईनचा साठा महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केला होता. दोन कंटेनरमधून सुमारे ३ हजार किलो ड्रग जप्त केले होते. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत २१ हजार कोटी रुपये होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -