
उदय निरगुडकर, ज्येष्ठ पत्रकार
अलीकडे सर्व माध्यमांमधून ‘भव्य काशी, दिव्य काशी’चा जयघोष झाला. याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या ‘काशी विश्वनाथ कॉरिडॉर’च्या वचनपूर्तीसाठी वाराणसीमध्ये होते. वाराणसी हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ. संपूर्ण समारंभाला आणि एकूणच काशी विश्वनाथ कॉरिडॉरला धार्मिक, आध्यात्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक असे अनेक पदर आहेत. वाराणसीला जेवढा ऐतिहासिक, आध्यात्मिक वारसा आहे, त्यापेक्षा कित्येक अधिक पटीनं भविष्यातल्या राजकारणातही महत्त्व आहे. मोदींच्या दोन दिवसांच्या भरगच्च वाराणसी दौऱ्यात हे वारंवार अधोरेखीत झालं.
दोन दिवसांतली मोदींची प्रत्येक कृती माध्यमांमध्ये कव्हर केली गेली. अर्थातच २५० वर्षांमध्ये घडलेल्या अत्याचाराचं परिमार्जन होणार असल्यामुळे याचं भविष्यकालीन महत्त्व सर्वच माध्यमांनी ओळखलं. काशीचा इतिहास जसा श्रद्धांचा तसाच तो मुस्लीम आक्रमकांचादेखील. मोदींनी आपल्या भाषणात यातल्या आक्रमणावर म्हणजे औरंगजेबाच्या अत्याचाराला उजाळा देताना औरंगजेबसमोर शिवाजी महाराज प्रत्येक वेळी उभे राहतात, याची आठवण करून दिली. अहिल्याबाईंचं पुण्यस्मरण केलं. यापूर्वी झालेल्या काशीच्या निर्माणाचं श्रेय नि:संशय अहिल्याबाई होळकरांना जातं. सर्वात महत्त्वाचा उल्लेख मोदींनी केला तो सुहेल देव यांचा. मोदींचं निवडक निमंत्रितांसमोरचं भाषण वक्तृत्वाचा अफलातून नमुना होता. हे केवळ पुनर्निर्माणाचं काम नाही तर, त्यातल्या विकासाच्या बाजूवर जोर द्यायला मोदी विसरले नाहीत.
अर्थातच, मोदींच्या दौऱ्यावर आणि त्यांच्या भाषणावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. हिंदू बहुसंख्याक वाद आणि हिंदू राष्ट्र ही या देशाची ओळख आणि संस्कृती बनणार का, असा सवाल केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून कर्तारपूर कॉरिडॉर निर्मितीचे दाखले भाजपकडून देण्यात आले. या हल्ल्या-प्रतिहल्ल्यातली निचतम पातळी समाजवादी पक्षाच्या अखिलेश यादव यांनी गाठली. टीका करता करता त्यांची जीभ घसरली आणि संसद भवनापर्यंत पडसाद पोहोचले. मोदींच्या गंगास्नानावर राहुल गांधी यांनी टीकेची झोड उठवली आणि मध्यरात्री वाराणसी रेल्वे स्टेशनवरचा दौरा इव्हेंट मॅनेजमेंट आणि पब्लिक रिलेशनचा खेळ आहे, अशी टीका करण्यात आली. एकूणच, काशी जेवढी धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक तेवढीच राजकीय आहे, हेच यातून उघड होतं.
यापूर्वीदेखील मोदींवर वैयक्तिक टीका झाली, तेव्हा त्याचा उलट परिणाम होऊन मोदींची लोकप्रियता वाढतच गेली. प्रशांत किशोर या निवडणूक रणनीतीकारांनी देखील केवळ टीका करून मोदी यांना हरवता येणार नाही, याची कबुली पश्चिम बंगालच्या ममता विजयानंतरदेखील दिली आहे. अर्थात, गंगेत डुबकी घेतल्याची दृश्यं आजवरच्या सर्वच नेत्यांची आहेत. त्यात ममतादीदी आहेत, राजकारणात प्रवेश करतानाचे सोनिया गांधींचे फोटो आहेत. अरविंद केजरीवालांचे आहेत. मग निवडणुकीच्या तोंडावर मोदींच्या गंगास्नानाला आक्षेप घेऊन माध्यमांना ही विसंगती दाखवण्याची संधी मात्र मिळाली. सात वर्षांपूर्वी मोदींनी वाराणसीत प्रचार करताना माँ गंगाने मुझे बुलाया है, अशी भावनिक साद घातली होती. त्याच वेळी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं सूतोवाचदेखील केलं होतं. काशी विश्वनाथ ते गंगा या मार्गात दशकानुदशकं उभे केलेले सर्व अडथळे दूर करून मोदींनी तो मार्ग प्रशस्त केला. एकूण १४०० दुकानदार आणि ४०० घरं स्थलांतरित केली गेली. या जुन्या घरांच्या भिंतीआड मग शेकडो वर्षं जुनी अशी अनेक देवळं प्रकट झाली.
एकीकडे, भारताच्या सेक्युलॅरिझमचे ढोल वाजवले जात असताना प्रथमच या देशाचे पंतप्रधान भगवी वस्त्रं परिधान करून, कपाळभर चंदन लावून गंगेत डुबकी मारताना दिसले. अर्थातच, देशातल्या जनतेच्या विचारांची कूस बदलल्याचं ते निदर्शक आहे. यामुळे एकूणच धर्मनिरपेक्षता, हिंदू आणि हिंदुत्व यावर चर्चा होणं स्वाभाविक होतं. या देशात हिंदू देवदेवतांची देवळंच सरकारच्या अखत्यारित आहेत, मग हाच न्याय मुस्लीम मशिदी, ख्रिश्चनांची चर्च आणि शिखांच्या गुरूद्वारांना का बरं नाही, असा बिनतोड सवाल पुढे आला. हिंदू ज्याप्रमाणे कुटुंबपद्धती ‘हेड ऑफ द फॅमिली’ किंवा एचयूएफ ही संकल्पना आहे, मग तशी ती ख्रिश्चन आणि मुसलमानांमध्ये का बरं नाही? ईस्टर सणाच्या संदेशावेळी ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी इंग्लंड हा ख्रिश्चन देश आहे, असे उद्गार काढले होते, तर अमेरिकेतल्या सर्वोच्च न्यायालयानेही अमेरिका हा ख्रिश्चन देश आहे, असं सूतोवाच केलं होतं. मग भारतामध्ये सेक्युलॅरिझमचं हे भूत का बरं नाचवता, असा सवाल त्यानिमित्ताने पुढे आला. सेक्युलॅरिझम आचरणात आणण्याचे ढोबळमानाने दोन मार्ग दिसतात. सर्वच धर्मांपासून समान अंतर राखून हा एक मार्ग आणि दुसरा म्हणजे सर्वच धर्मात समान गुंतवणूक. पण प्रत्यक्षात जगात कुठेच असं होताना दिसत नाही.
आज सर्वत्र बहुसंख्याकांच्या धर्माचा प्रभाव एकूणच समाजजीवनावर पडलेला दिसतो. त्याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशाचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचं ट्विट महत्त्वाचं आहे. अयोध्या, काशी भव्य निर्माण जारी है, मथुरा की तय्यारी है... एकूण काय, तर पराभूत मानसिकतेतला हिंदू जागृत करून एकत्र करण्याचा संदेश काशी विश्वनाथ कॉरिडॉरने दिला. याचं श्रेय निश्चितच या दोन दिवसांच्या दौऱ्याला द्यायला हवं. इथल्या अर्थव्यवस्थेला या पर्यटनाचा मोठा हातभार लाभत आहे. लक्षात घ्या, देशातले एकूण सुमारे २३ टक्के पर्यटक एकट्या उत्तर प्रदेशमध्ये जातात. ही संख्या वाढवण्यासाठी आता उत्तर प्रदेश रामायण सर्किट, महाभारत सर्किट, जैन सर्किट, बुद्ध सर्किट, स्पिरीच्युअल सर्किट अशा आकर्षक पॅकेज टूर तयार करत आहे. पण त्यासाठी कायदा-सुव्यवस्था उत्तम हवी. योगी सरकार गेली काही वर्षं यावर लक्ष का केंद्रित करतंय, हे आता लक्षात येईल.
वाराणसीचा मुख्य प्रश्न आहे तो पायाभूत सोयी-सुविधांचा. आज शहरात ५० टक्के पाणीपुरवठा बाजूने वाहणाऱ्या गंगेतून होतो आणि बाकीचा हजारोंनी खणलेल्या कूपनलिकेतून. हे चिंताजनक आहे. फक्त तीस टक्के भूभागावर अंडरग्राऊंड मलनि:सारणाची व्यवस्था आहे. लोकांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या सवयी भीषण आहेत. घराबाहेर कचरा टाकणं, मग तो सफाई कर्मचाऱ्यांनी उचलून साफ करणं आणि फारशी शास्त्रोक्त विल्हेवाट न लावता तो दुसरीकडे टाकून देणं अशी इथली परिस्थिती. यामुळे गंगेचं प्रदूषणदेखील वाढलं आणि प्रशासनावरचा बोजाही. म्हणूनच मोदींनी अत्यंत चतुराईने आपल्या भाषणात काशी विश्वनाथ विरासतीबरोबरच विकासाचं सूत्र गुंफलं.