पुणे (प्रतिनिधी) : ‘उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून २०१९ मध्ये त्यांनी भाजपसोबत विश्वासघात केला’, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी पुण्यात केला. ‘देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे मातोश्रीवरील बैठकीत ठरले होते’, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. तसेच ‘हिंमत असेल, तर आता सत्तेतून पायउतार व्हा आणि मग मैदानात उतरून दोन हात करा’, असे खुले आव्हानही शहा यांनी यावेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडी सरकारला दिले. यावेळी शहा यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर चौफेर टीका केली. शिवसेनेवर निशाणा साधताना २०१९च्या निवडणुकीत भाजपसोबत शिवसेनेने विश्वासघात केल्याचा आरोपही त्यांनी लगावला. पुण्यात आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
‘मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने हिंदुत्व बाजूला ठेवले आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून २०१९ मध्ये त्यांनी भाजपसोबत विश्वासघात केला. सत्तेतून पायउतार व्हा आणि मग मैदानात उतरून दोन – दोन हात करू. जनता कुणाला कौल देते हे पाहूयात. तिन्ही पक्षांनी एकत्र लढून भाजपला हरवून दाखवावे’, असे आव्हानही केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी यावेळी दिले.
‘राज्यातील सरकारने पेट्रोल स्वस्त करायचे सोडून दारू स्वस्त केली. उद्धव ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेल का स्वस्त केले नाही?’ असा खडा सवाल त्यांनी केला. देशभरातील अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केला. पण इथल्या महाविकास आघाडी सरकारने दारूवरील कर कमी केला’, असा आरोपही शहा यांनी केला.
आपल्या भाषणात शहा म्हणाले की, ‘मित्रांनो, पंतप्रधान मोदींनी ‘डीबीटी’ची निर्मिती केली. या ‘डीबीटी’चा अर्थ हा ‘डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर’ असा आहे. म्हणजे गरजवंतास थेट मदत पुरवठा. मात्र काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने ‘डीबीटी’ची नवी व्याख्या तयार केली. काँग्रेसने यामधले ‘डी’ पकडले, त्याचा त्यांनी अर्थ काढला ‘डायरेक्ट’च्या जागी ‘डीलर’, शिवसेनेने ‘बी’ पकडला व त्यांचा अर्थ ‘ब्रोकर’ आणि राष्ट्रवादीने अर्थ ट्रान्सफरमध्ये कट मनी असा लावला. आम्ही ‘डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर’ म्हणतो. तर हे ‘डीलर, ब्रोकर आणि ट्रान्सफर’चा बिझनेस म्हणतात. सांगा महाराष्ट्राच्या जनतेला काय हवे आहे’.
तसेच, ‘ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. टिळकांनी सांगितले होते, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवूनच राहीन. शिवसेना म्हणते, सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, कोणत्याही प्रकारे मी तो मिळवेनच.
आता बनले आहेत एकदा मुख्यमंत्री. मी आजही सांगू इच्छतो, जर हिंमत असेल, तर राजीनामा द्या आणि करा दोन-दोन हात. तिघेही जण एकसाथ लढण्यास पुढे या. भाजपचा कार्यकर्ता तयार आहे. महाराष्ट्राची जनता देखील हिशेब करायला तयार बसलेली आहे. अशा प्रकारचे तत्त्वहीन राजकारण कोणत्याही राज्यातील जनतेला कधीच आवडणार नाही’, असेही शहा यांनी यावेळी स्पष्ट केले.
छत्रपतींच्या स्मारकाचे भूमिपूजन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन पुणे दौऱ्याला सुरुवात केली. आगामी काळात होणाऱ्या पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, तर शहा यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही’, असे शहा यावेळी म्हणाले.