अॅडलेड (वृत्तसंस्था): दुसरी कसोटी २७२ धावांनी जिंकताना ऑस्ट्रेलियाने अॅशेस कसोटी मालिकेतील विजयी आघाडी २-० अशी वाढवली. इंग्लंडने पाचव्या आणि अंतिम दिवशी जवळपास दोन सत्रे (७० ओव्हर्स) खेळून काढताना पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, यजमान गोलंदाज सरस ठरले.
३ बाद ७० धावांवरून पुढे खेळणाऱ्या पाहुण्यांचा डाव १९२ धावांवर आटोपला. इंग्लंडच्या उर्वरित फलंदाजांनी १२२ धावांची भर घातली. पाहुण्यांनी किती धावा केल्या. त्यापेक्षा बेन स्टोक्स, जोस बटलर आणि ख्रिस वोक्स तसेच तळातील ऑली रॉबिन्सन आणि स्टुअर्ट ब्रॉडने खेळपट्टीवर थांबण्याची दाखवलेली जिगर उल्लेखनीय आहे. ब्रॉडने १२ धावांसाठी ७७ चेंडू घेतले. तो ११० मिनिटे मैदानावर होता. बटलरने सर्वाधिक चेंडू आणि सर्वाधिक मिनिटे खेळपट्टीवर तळ ठोकला. इंग्लंडच्या यष्टिरक्षक, फलंदाजाने २०७ चेंडूंचा सामना करताना २६ धावा केल्या. त्याने २५८ मिनिटे म्हणजेच चार तास किल्ला लढवला. वोक्सने ९७ चेंडूंत ४४ धावा फटकावल्या. तो ११९ चेंडू खेळपट्टीवर होता. रॉबिन्सननशे ३९ चेंडू खेळून ८ धावा काढल्या. स्टुअर्ट ब्रॉडने ३१ चेंडूंत नाबाद ९ धावा केल्या. रॉबिन्सनने ६१ आणि ब्रॉडने ४८ मिनिटे खेळपट्टीवर तग धरला.
इंग्लंडच्या मधल्या फळीसह शेपटाने थोडा संयम दाखवला तरी वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनने ४२ धावांत ५ विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला. त्याला मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉनची (प्रत्येकी २ विकेट) चांगली साथ लाभली. दिवस-रात्र कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ९ बाद ४७३ धावांवर घोषित केला आहे. प्रतिस्पर्ध्यांना २३६ धावांवर गुंडाळताना त्यांनी २३७ धावांची मोठी आघाडी घेतली. ही आघाडी निर्णायक ठरली.
यजमानांनी ब्रिस्बेन कसोटीत इंग्लंडवर ९ विकेट राखून विजय मिळवला होता. अॅडलेड कसोटी आपल्या नावे करताना ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. सोमवारच्या विजयानंतर डे-नाईट कसोटीत १०० टक्के विजयाचा विक्रमही ऑस्ट्रेलियाने कायम ठेवला. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मॅर्नस लॅबुशेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.