
मुंबई : महाविकास आघाडी सरकारने गाजावाजा करून सुरू केलेली गरीब गरजूंसाठीची योजना बंद होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून शिवभोजन केंद्राचे (Shivbhojan Kendra) अनुदान रखडल्याने राज्यातील शिवभोजन केंद्र संचालक अडचणीत आले आहेत. शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून असहाय-वृद्ध व गरीब घटकातील नागरिकांना भोजन मिळत होते. मात्र, हळूहळू यातील अनुदान बंद होत गेल्याने संचालकांनी केंद्र सुरू ठेवण्यास असमर्थता दर्शविली आहे. तातडीने यावर उपाय न शोधल्यास गरीब-गरजू नागरिकांची अडचण होणार आहे.
ही योजना बंदच पडणार होती. कारण शेतकरी- विद्यार्थी आणि राज्यातील सर्वच घटकांना या सरकारने कुठलाही दिलासा दिलेला नाही. राज्याचे माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर टीका करताना राज्यात सरकार आहे का?असा प्रश्न विचारला आहे.
आधीच कोरोना काळात राज्यातील जनतेचे आर्थिक गणित बिघडले आहे. हजारो हातांना काम उरलेले नाही. त्यातच गरीब गरजू घटकांना आवश्यक असलेली ही योजना बंद झाल्यास गरीब-गरजू नागरिकांची मोठी अडचण होणार आहे.