Sunday, July 21, 2024

‘रेस’

कथा : डॉ. विजया वाड

२०२०चे ऑलिम्पिक जपानला टोकियोमध्ये झाले. ‘ऑलिम्पिक’ स्पर्धा म्हणजे का खायचे काम? पण जॅस्मिन कमाचो-क्विन ही मुलगी अडथळ्यांची शर्यत (हर्डल रेस) जिंकली. जॅस्मिनने हे कसे साधले? त्याचीच ही रोमहर्षक कथा.
जॅस्मिन २०१६ची ऑलिम्पिक हरली होती. निराश होती. जॅस्मिन आपल्या कंपूमध्ये मौज करीत होती. हॉटेलमध्ये जेवत होते मित्र-मित्र. त्यात मैत्रीण जॅस्मिनच होती. तेव्हा शेजारच्या व्यक्तीकडे तिचे लक्ष गेले. ती व्यक्ती अंध होती. तिच्या शेजारी एक कागद होता.
“मी भुकेली आहे. कोणी मला जेवण देईल का?” जॅस्मिनने पुढ्यातली खाण्याची डिश तिला दिली. मित्रांनी हसून थट्टा केली. पण ती अंध व्यक्ती खूश झाली ना! जॅस्मिन पण खूश झाली. अंध व्यक्तीने भरभरून शुभेच्छा दिल्या. तिचा देश इटुकला होता. मिटुकला होता. मित्रांनी थट्टा केली, तरी नाखूश न होता म्हणाली, “तिचं समाधान बघा. चेहरा निथळतोय खुशीनं. मी मला सापडले.” मित्रांना समजले नाहीच. एवढा कोण विचार करतो का? जॅस्मिन अडथळ्यांची शर्यत जिंकण्यासाठी सराव करीत होती.

‘‘आशेचा किरण असा, गडद अंधारी पाडी कवडसा,
त्या कवडशाचाच गडद निराशेत भरवसा भरोसा!’’

जर तो कायमचा अंधार घेऊन जगणारी व्यक्ती भरवसा ठेवून सुख शोधते, तर मला काय कमी आहे? मी हरले ऑलिम्पिक… एकदा! किती काळ दु:ख करू? मला परत सराव केला पाहिजे, करावाच लागेल. करणं प्राप्त आहे. जॅस्मिन स्वत:ला सापडली होती ना! ते सर्वात महत्त्वाचं होतं.

२०२०ची ऑलिम्पिक. दिवस-रात्र मेहनत करून जॅस्मिन ही स्पर्धा जिंकली. तेव्हा ती भाषणात म्हणाली, “निराशेच्या गडद अंधारात आशेचा किरण ज्याला सापडतो तो अहोभाग्याचा! मला तो सापडला. सो? आशा सोडू नका. नेव्हर लूज होप!” जॅस्मिन घरी गेली. आई म्हणाली, “अगं मरता मरता वाचणारी माणसं दीर्घायुष्य जगतात. मी स्वत: बघितली आहेत. सक्सेस इज नेव्हर फायनल अँड फेल्युअर नेव्हर फेटल! इट इज करेज दॅट काऊंट्स! अन् बघता बघता जॅस्मिन उभी राहिली परत! नेटाने! आत्मविश्वासाने. प्रयत्न पुन्हा नव्याने, नव्या दमाने चालू केले. तिचे प्रशिक्षक म्हणाले, “जखमी, घायाळ… माणसे जखमा सावरून नेटाने उभी राहतात, तेव्हा यशही लाजून त्यांची पाठराखण करते.”
२०२०ची ऑलिम्पिक.इटुकला देश परत उभा राहिला. अडथळ्यांची शर्यत! जॅस्मिन एक स्पर्धक. “२०१६त तू हरली होतीस ना?”
“हो हरले होते. पण आता जिंकणार आहे.”
“इतका आत्मविश्वास?”

“निराश माणसं जिंकण्याची जिद्द बाळगतात ना… तेव्हा ती कोणाचं ऐकत नाहीत. प्राणपणाने लढतात अन् जेव्हा प्राणांची बाजी लागते ना, तेव्हा यश आपले मार्ग बदलून त्या प्राणांची बाजी लावणाऱ्याच्या पाठी धावते. वेडी माणसेच जग जिंकू शकतात; हे लक्षात असू द्या.”
लोक काय हो? दुसऱ्याचं हसं व्हावं म्हणून आतुर. दुसऱ्याची फजिती झाली, की हे आनंदी.
अडथळ्यांची शर्यत सुरू झाली. वर्ष २०२०. जॅस्मिन, आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करीत होती. प्रचंड आत्मविश्वास!
‘जेव्हा माझा देश माझा श्वास, माझी आण,
देशासाठी तळहातावर घेतले, मी माझे प्राण! माझे प्राण!’
आणि देश जिंकला. देशावर प्रेम करणारी जॅस्मिन हर्षभराने नाचली. देश ‘किती’ मोठा, यावर त्याचं मोजमाप थोडीच होतं. छोट्या देशातली माणसं आपल्या देशाला, आपल्या भीमपराक्रमानं मोठी करतात.
पहिल्या नंबराची पदकं जिंकणारी माणसं… त्यांच्या देशाचं देशगीत वाजवलं जातं! अभिमानाने ऊर भरून येतो ना?
“जनगणमन अधिनायक जय हे भारत भाग्यविधाता!” ऊर भरून येतो ना? छाती अभिमानाने फुलून येते ना? तिरंगा लहरताना किती आनंद-आनंद होतो ना? मला तर बाबा अत्यानंद होतो.
जॅस्मिनचा इटुकला देश! त्याचे राष्ट्रगीत वाजले अन् जॅस्मिनचे हृदय आनंदाने उसळून आले.
ही आनंदाची वार्ता तिच्या देशाला तत्क्षणी. ‘टीव्ही’ हे केवढे प्रभावी माध्यम आहे ना?
मित्रांनो, जॅस्मिनची गोष्ट एवढ्यासाठी लक्षात ठेवायची की, अपयशाने खचून जाऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. आज खचलात, तर काय उपयोग?
तो कोळी आठवा. पडतो… पण न थांबता, न खचता परत आगेकूच सुरू. हा माझा मार्ग एकला! आणि जे स्थान हवे, त्या जागेपर्यंत उठत धडपडत पोहोचतोच पोहोचतो.
जॅस्मिन जग जिंकली. तिच्या देशाचे गीत वाजले.
ती धन्य धन्य झाली.
राष्ट्रप्रमुखांनी अभिनंदन केले.
“ब्राव्हो जॅस्मिन. वी आर प्राऊड ऑफ यू!” किती सुंदर शब्द!
जीवन उजळून टाकणारे. जीवनावर नवा प्रकाश टाकणारे.
जीवन प्रभावी करणे आपल्या हाती आहे मित्रांनो.
हे कायम लक्षात ठेवा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -