Thursday, July 25, 2024
Homeमहत्वाची बातमीदेशात होणार राष्ट्रीय ‘सहकार’ विद्यापीठाची स्थापना

देशात होणार राष्ट्रीय ‘सहकार’ विद्यापीठाची स्थापना

पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन (वामनीकॉम) संस्थेमधून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते. तीच उत्तम, दर्जेदार शिक्षणाची परंपरा कायम ठेवावी. देशाची अर्थव्यवस्था लवकरच ५ ट्रिलियन डॉलर होणार आहे. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे त्यामध्ये मोठे योगदान असेल. देशात लवकरच ‘राष्ट्रीय सहकार’ विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. प्रत्येक राज्यात या विद्यापीठाची एक शाखा असेल, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री तथा गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात रविवारी केले. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्थेच्या २७ व्या पदवी बॅचचा तर ५३-५४ व्या पदविका बॅचच्या दीक्षांत समारंभप्रसंगी केंद्रीय सहकार अमित शाह बोलत होते.

शाह म्हणाले, की पुणे शहर ऐतिहासिक असून देशाच्या शिक्षणाचे माहेरघर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वदेश, स्वधर्माचा नारा दिला. तोच नारा घेऊन केंद्र सरकार देशात काम करत आहे. वस्तूत: याआधीच देशात सहकार मंत्रालयाची स्थापना करायला हवी होती. परंतु, ती आम्ही केली. सहकारात मोठी क्षमता असून कामाबरोबर आत्मसन्मान देखील आहे.

सहकाराशिवाय १३० कोटी लोकांना आत्मनिर्भर बनविणे शक्य नाही. सहकारात काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत. त्यावर आम्ही पायबंद घालणार आहोत. त्यासाठी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह ॲक्ट, प्रायमरी ॲग्रीकल्चर क्रेडिट सोसायटी (पॅक्स) या तसेच इतर काही ॲक्टमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. सुरूवातीला सर्व सहकारी बँका संगणकीकरणातून जिल्हा बँकांना जोडणार त्यानंतर नाबार्डबरोबर जोडून पारदर्शकपणा आणणार आहे. गावागावात सहकार पोहोचवला जाणार आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे, असे मत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

पुण्यातच होणार राष्ट्रीय सहकार विद्यापीठ?

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन (वामनीकॉम) संस्थेचा परिसर मोठा आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निकषानुसार नवीन विद्यापीठासाठी किमान १० एकर जागा हवी असते. पुणे विद्यापीठाच्या बाजूला वामनीकॉमची १५ एकराची जागा आहे. तसेच सभागृह, निवास व्यवस्थांसह इतर सर्व सोयीसुविधा आधीपासून तयार आहेत. सहकारमंत्री अमित शाह यांच्याबरोबर विद्यापीठ स्थापन करण्याबाबत यापूर्वीच बोलणी झाली आहे. याबाबत ते लवकरच घोषणा करणार आहेत, अशी माहिती सहकार तज्ज्ञ तथा दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन लि.चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी याप्रसंगी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -