गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
डिसेंबर महिन्यातील गारवा, प्रवासासाठी सर्वांना हवाहवासा वाटतो. बरेचजण एक छोटीशी पिकनिक तरी काढतात. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोघे स्वतंत्रपणे ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. त्यातली एक आठवण शेअर करते.
बुर्ले हेड हे एक छोटेसे राष्ट्रीय उद्यान असून गोल्ड कोस्टचे प्रमुख ठिकाण आहे. गोल्ड कोस्ट हे ऑस्ट्रेलियातील क्वीन्स लँड राज्यातील मोठे प्रसिद्ध पर्यटन स्थळ होय. ब्रिस्बेन शहरापासून अंदाजे ९० किलोमीटर अंतरावर आहे. गोल्ड कोस्ट हे सर्फिंगसाठी जगातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. सर्फिंग म्हणजे एका खास फळीवर उभे राहून समुद्राच्या लाटांवर स्वार होणे.
सर्फिंगसाठी गोल्ड कोस्टचे समुद्रकिनारे आणि त्या महासागरातील लाटा योग्य आहेत. सर्फिंग या खेळाबरोबरच सर्व प्रकारच्या मनोरंजनासाठी बांधलेली अप्रतिम, भव्य अशी तीन-चार थीम पार्क. सर्फर पॅराडाईज आणि थीम पार्कला भेट दिल्यानंतर हॉटेलच्या स्वागतिकेने सांगितल्यानुसार लोकल ट्राम बसने आम्ही दोघे बुर्ले बीचवर पोहोचलो. विस्तीर्ण विस्तारलेला समुद्र तसाच खूपच रुंद, मोठा पांढरा वालुकामय किनारा, दादरच्या नारळी बागेप्रमाणे उंचच्या उंच झाडे. किनाऱ्यावर गर्दी नव्हती, तरी वर्दळ होती. लहान मुलांबरोबर विश्रांती घेत पहुडलेली काही कुटुंबं, किनाऱ्यावर फेऱ्या मारणारे तुरळक लोक, मजा मारण्यासाठी आलेला शालेय मुलांचा घोळकाही होता. सुरुवातीलाच प्रवाशांसाठी केलेली वॉशरूमची सोय चांगली होती. सारे वातावरण शांत, पण मोहवणारे होते. दोन्ही हाताला नि समोर पसरलेला दृष्टीत न मावणारा समुद्र पाहण्यासाठी प्रशस्त चौकोनाच्या आत विश्रांतीसाठी चौथरेही बांधले आहेत.
आजूबाजूला विशेष काही न दिसल्याने आम्ही साशंक झालो. लोकांशी संवाद साधल्यावर वाळूबाहेरील फुटपाथवरून उद्यानाच्या दिशेने चालू लागलो. थोडे चालल्यावर तरुण, मध्यम वयाच्या लोकांची लगबग प्रकर्षाने लक्षात आली. चालणारे, पोहणारे, सर्फर करणारे पाहता या स्थानाचे महत्त्व लक्षात आले. विचारपूस करीत पुढे पुढे जात होतो. अंतर संपता संपत नव्हते, नंतर चालताना लागलेली चढ जाणवली. बाजूच्या निवासी बिल्डिंग, स्थानिक लोक, बाहेरील पर्यटक आणि समोर समुद्र पाहता चर्नी रोडपासून कफ परेड मार्गे मलबार हिलकडे जाणारा मार्ग आठवला. आणखी पुढे जाता टेकडीवरील नावाच्या फलकावर नजर स्थिरावली. ‘‘बुर्ले हेड नॅशनल पार्क’’ आपले स्वागत करीत आहे. yes got it!!
बुर्ले समुद्राच्या टोकाशी समुद्रातच नैसर्गिक उघड्या अवस्थेत हा डोंगर एका खास उद्देशाने ठेवला आहे. हा डोंगर कोणत्याही भूगर्भ शास्त्रज्ञांसाठी अमोल ठेवा आहे. प्राचीन ज्वालामुखीच्या इतिहासामुळे या खडकाची निर्मिती झाली. विद्यापीठातील भूगर्भीय शास्त्रज्ञ, काही विद्यार्थी येथील स्थानिक वन्यजीवांचा, वनस्पतींचा अभ्यास, संशोधन करण्यासाठी येतात. येथील वनस्पती, वन्यजीव टिकावेत, राहावेत, यासाठी हा नैसर्गिक वारसा जतन केला जात आहे. हे उद्यान रेन फॉरेस्टचा डोंगर, खारफुटी जंगलाचे अवशेष जतन करते. शिवाय येथे कोरड्या निलगिरी जंगलाचे वर्चस्व आहे. त्याच्या संरक्षणासाठी उद्यानात पाळीव प्राण्यांना बंदी आहे, कारण त्यांचा सुगंधदेखील मूळ प्राण्यांना घाबरवतो. शेकोटी पेटविण्यास बंदी, जनावरांना अन्न देऊ नका किंवा अन्न सोडू नका, मानवी अन्न वन्य जीवांस हानी पोहोचवू शकते. काही प्राणी आक्रमकही होऊ शकतात. सहज मनात एक प्रश्न येऊन गेला, एवढं चांगलं आपण का करू शकत नाही?
जोराचा वारा, पाऊस, आग यामुळे येथील हवामानासंबंधित काहीही सांगू शकत नाही. निसर्ग, संस्कृती आणि इतिहास असलेले बुर्ले हेड नॅशनल पार्क समुद्र सपाटीपासून ८८ मीटर उंच असून निलगिरी, खारफुटीचे जंगल, पांडनस ग्रोव्हाज वनस्पती आणि झाडाझुडपांनी तो वेढलेला आहे. बुर्ले बीच आणि टॅलेबडगेरा क्रिक (Tallebudgera)च्या दरम्यान वसलेले हे छोटेसे राष्ट्रीय उद्यान होय. टॅलेबडगेरा खाडीच्या बाजूने खडकाळ प्लॅटफॉर्म आणि वालुकामय किनाऱ्यावर, वाळूत मोठमोठे काळे दगड आहेत. खाली उतरून लोक या दगडांवर निवांतपणे विसावून येणाऱ्या लाटांना, सर्फिंग करणाऱ्यांना, समुद्रात पोहणाऱ्यांना दाद देतात. या खाडीतच खारफुटी खूप आहे.
या राष्ट्रीय उद्यानात दोन वॉकिंग ट्रॅक आहेत.
१. रेनफॉरेस्ट सर्किट, २. ओशन सर्किट.
१. रेनफॉरेस्ट सर्किट : माऊंट तंबोरिन हा डोंगर चढताना दोन्ही बाजूला उंच झाडाच्या आणि छोट्या झुडपांच्या अरण्यातून, दगड धोंड्याच्या खडकाळ पायवाटेवरून जाताना मध्ये मध्ये पायऱ्या चढत डोंगराला प्रदक्षिणा घालून समुद्रकिनाऱ्याच्या बाजूने बाहेर पडतो. झाडाझुडपांतून चालताना मध्ये मध्ये लागलेल्या झरोक्यातून (लूक आऊट) सुंदर विलोभनीय दृश्ये टिपतो. चढताना विश्रांतीसाठी ठरावीक अंतरावर बाक आहेत. शिवाय दोन सुरक्षित कडा बांधलेले व्ह्यू पॉइंट. थोडा वेळ थांबल्यास निळ्याशार लाटांत व्हेल मासा, समुद्री गरुड फिरताना दिसू शकतात. फक्त चित्रपटात पाहिलेले सर्फिंग येथे जवळून पाहतो. किती चढावे लागेल, या अंदाजासाठी लोकांना विचारले असता १० मिनिटे हेच उत्तर मिळत होते. रोजचे चालणारे बरेचजण सपसप वर चढत होते. खडकाळ चढ, उंच पायऱ्या, मुळात बुर्ले बीचच्या सुरुवातीच्या किनारपट्टीपासून आम्ही चालत होतो. थकल्याने थोड्या उंचीवरील एका संरक्षण कड असलेल्या देखाव्या कोनावर (view point) थांबलो, बसलो नि मागे फिरलो.
२. ओशन सर्किट : समुद्र किनाऱ्याच्या काठाने जाऊन डोंगरावरून खाली येणे. सुंदर दृश्यांसह सर्व वयोगटातील, सर्व क्षमतेचे लोक या ट्रॅकवरून म्हणजेच टॅलेबडगेरा खाडीवरून, निर्जन समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश करतात. समुद्रकिनारीच्या काठाने सुरक्षित असलेल्या रस्त्यावरून आम्ही चालू लागलो. पाम ट्री व इतर बाजूच्या झाडाझुडपांकडे पाहत, समुद्राची ताजी हवा घेत चालत होतो. समोर पसरलेला समुद्र आणि पाठीमागे उभा असलेला डोंगर, मध्ये चालणारे पर्यटक. सर्वोत्तम दृश्यासाठी ‘बुर्ले हेड’ असे म्हटले जाते, ते आम्ही अनुभवले. डोंगराच्या देखाव्या कोनावर उभ्या असलेल्या लोकांना हात हलवीत आम्ही संवादाची
देव-घेव केली. वाटेत ज्यांना डोंगरावर चढताना पहिले, ते डोंगरावरून खाली येताना भेटले. सुरुवातीच्या ओशन ट्रॅकवरून चालताना थोड्या-थोड्या अंतरावर आठ-दहा पायऱ्यांचे सुरक्षित जिने उतरून समुद्राकडे जात येते. पाण्यात डुबकी मारायची असेल, तर मारू शकता. डोंगरावरून खाली किंवा खालून वर जायला अंदाजे एक तास लागतो. सर्वांनी काही ठरावीक अंतरापर्यंत या ट्रॅकवरून चालण्याचा अनुभव घ्यावा. निसर्गाकडे जायचे, तर गोल्ड कोस्टमधील ‘बुर्ले हेडलँड नॅशनल पार्क’ हा एक उत्तम पर्याय आहे. कुटुंबासाठी लोकप्रिय अन् शांत…
[email protected]