पूर्णिमा शिंदे
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या मंत्राचे उच्चारण आणि मानवी जीवन अवघे सुसह्य तसेच मोक्षप्राप्तीचा लाभ होण्यासाठी दत्तसेवा महत्त्वाची. दत्तगुरू म्हणजे चैतन्यरूपी भक्तीचा भावसागर. ‘दत्तगुरू, भक्तजना कल्पतरू, भजन समाधीमाजी तारू, विघ्नहरू दत्तगुरू’. दत्त जयंतीची, दत्त जन्माची एक पौराणिक कथा आहे, अनुसयाची कथा. प्रभू दत्तांचा त्रिमूर्ती अवतार, मृगनक्षत्र मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी झालेला जन्म हीच कथा. एक फार मोठे तपस्वी ऋषी होते, त्यांचे नाव अत्री. त्यांची पत्नी अनुसया. पतीची उत्तम सेवा करणारी साध्वी पतिव्रता. पतीबद्दल आनंदी, भक्ती, आदर करणारी. आपल्या आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे स्वागत करून आदराने भोजन देणारी अनुसया. दारी आलेला अतिथी उपाशी जाऊ नये, हीच तिची धारणा.
तिच्या पातिव्रत्याबद्दल सारी पंचमहाभुते तिला शरण जात. तिच्यासमोर सूर्यदेव शांत होई, वायू शांत होई, अग्नी शीतल होई. तिन्ही लोकांत तिचे अतिशय नाव दुमदुमले. हे सर्व विष्णुपत्नी लक्ष्मी, शंकर पत्नी पार्वती आणि ब्रह्मदेव पत्नी सावित्री यांच्या कानी गेली. अनुसया शूद्र मानव स्त्री आणि तिच्याबद्दल इतके कौतुक होतं, हे ऐकून या तिघींनाही मत्सर वाटू लागला. आता आपण तिचे शील भ्रष्ट करून सत्त्वहरणच करावे, या हेतूने त्या तिघी देवींनी आपापल्या पतीस सांगून अनुसयाची परीक्षा घेण्याचे ठरविले. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी ब्राह्मण रूप धारण करून अत्री ऋषींच्या आश्रमात भर दुपारी गेले. ब्राह्मणांचा अतिथी म्हणून आदर करून तिने भक्तिभावाने पूजन केले आणि सुग्रास भोजन वाढले. त्यातील एक अतिथी ब्राह्मण म्हणाला, तू निर्वस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढावे. आता मात्र अनुसयाला अंतर्ज्ञानाने सर्व उमजले. आपली कोणी तरी परीक्षा घेत आहे. त्या थेट पूजास्थानी असलेल्या आपल्या पती अत्री ऋषींकडे गेली आणि ही गोष्ट त्यास सांगितली. अत्री ऋषींनी ओळखले आणि अनुसयाच्या हाती गंगोदक देऊन त्या तिघांवर शिंपड, असे सांगितले. ते गंगोदक घेऊन अनुसयेने त्या तिघांवर उडविले आणि त्या तिघांची तत्काळ तीन बालके झाली. ती तीन बालके उचलून घेत त्यांना यथेच्छ स्तनपान देऊन अनुसयेने तृप्त केले.
कळीचे नारद मुनी हे अत्री ऋषींच्या आश्रमात पाहण्यास आले असताना ही तीन बाळे रांगत असलेली पाहिली आणि ही घटना नारदमुनींनी तिघांच्याही पत्नींना सांगितली. तीनही देवी चिंताक्रांत झाल्या आणि आम्हाला अनुसयाकडे घेऊन चला, आम्ही तिची क्षमायाचना मागतो आणि खरोखर अनुसयाकडे त्यांनी क्षमायाचना केली. अत्री ऋषींनी पुन्हा एकदा गंगोदक अनुसयेच्या हाती देऊन ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्यावर शिंपडण्यास सांगितले. अनुसयेने तसे केले. ब्रह्मा-विष्णू-महेश हे तिघे अनुसयावर प्रसन्न झाले आणि तू वर माग, असे म्हणाले. यावर अनुसया मातेने तुम्ही तिघांनी त्रिमूर्ती होऊन पुत्राप्रमाणे माझ्या घरी राहावे, असा वर मागितला. शंकरापासून दुर्वास झाले, ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त. तिघांपैकी चंद्र आणि दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी अनुमती घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी आणि तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला.
प्राचीन काळी स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती वाढल्या होत्या. देवदेवतांना खूप प्रयत्न करूनही असुरी शक्तींचा नायनाट करण्यात अपयश आले. ते कार्य श्री गुरुदेव दत्त यांनी केले. श्री दत्तगुरू यांचा मार्गशीर्ष पौर्णिमाचा जन्मदिवस. ही दत्तजयंती म्हणून साजरी केली जाते. ही कथा आहे श्री दत्त जन्माची. अनुसयाची कथा म्हणून ओळखली जाते. अनुसयाचे शील भ्रष्ट करण्यासाठी नारदमुनींनी लावलेल्या कळीनंतरही सती शीलवान पतिव्रता ठरली. अनुसयाचे बालक त्रिमूर्ती श्री दत्त अवतार आहे. दत्त हे परब्रह्म त्रिगुणात्मक त्रिमूर्ती. त्यांचे करुणासागर सुंदर मोहक मनोहरी रूप दत्त अवतार आहेत. दत्ताच्या परिवाराचा भावार्थ. दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद. औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे. कारण त्यात दत्ततत्त्व जास्त प्रमाणात असते.
दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरू केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू राहावी, ही शिकवण दिली. गुरू मानून, गुरू करून हा देह क्षणभंगूर असल्याचे सांगितले. शहरातील प्रत्येक वस्तूत ईश्वराचा वास आहे. अस्तित्व पाहण्यासाठी दत्तगुरूंनी चोवीस गुरू केले. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार. श्री नृसिंह सरस्वती दुसरा अवतार. माणिक प्रभू तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे चौथे. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत. जैन पंथी दत्तगुरूंकडे नेमिनाथ म्हणून पाहतात.
दत्तगुरू दररोज खूप भ्रमण करीत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला जात, तर भिक्षेसाठी कोल्हापूरला आणि जेवणासाठी पांचाळेश्वर येथे जात. कीर्तन ऐकण्यासाठी नैमिषारण्यात, बिहार येथे पोहोचत आणि निद्रेसाठी माहूरगडावर आणि योगासाठी गिरनार पर्वतावर भ्रमण करीत असत. दत्तपूजेसाठी सगुण मूर्तीऐवजी पादुका आणि औदुंबर वृक्ष यांची पूजा करावी. दत्त श्री गुरुदेव आहे, त्यांना परमगुरू मानून गुरू स्वरूपात उपासना करावी. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ नामजप करावा. त्यांच्या खांद्याला जी झोळी आहे हे मधुमक्षिकाचे प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात, तसेच झोळी ही प्रतीक आहे. झोळीतील भिक्षा अहंकार नष्ट करते.
दत्तजयंती उत्सव साजरा करण्यासाठी नामसंकीर्तन, अनुसंधान, भजनकीर्तन, आरती, पूजन, प्रवचन आणि विशिष्ट गुरुचरित्राचे पारायण अत्यंत महनीय आहे. मानवी जीवनात काम, क्रोध, मद, माया, मोह, मत्सर षडरिपू असतात. त्यातून अहंकारी मानवाचा दानव होतो, पण ज्यावर दत्तकृपा, गुरुदेव मार्गदर्शन आहे, त्यांच्या जीवनाचे सोने होते. हे सोने करण्याचे सर्वस्वी साधन गुरुचरित्र आहे आणि ते जीवनाचे भान देते. परब्रह्म हे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती, महाज्ञानी, करुणासागर, सुंदर मोहक माऊली.
महाराष्ट्रामध्ये औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर या ठिकाणी या उत्सवाला अतिशय महत्त्व दिले जाते. दत्तजयंतीनिमित्त या ठिकाणी दत्तयाग केला जातो. दत्तयाग म्हणजे पवमान पंचसूक्त आवृत्त्या (जप). त्यांच्या दशांश आणि तृतीअंशाने धृत (तूप )आणि तीळ यांचे हवन करतात. दत्तयागासाठी केल्या जाणाऱ्या जपाची संख्या निश्चित नाही. स्थानिक पुरोहितांच्या समादेशाने हवन केले जाते. दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत, महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही भक्तिभावाने साजरा केला जातो.
श्री दत्तात्रेय कवच, दत्तबावणी, गुरुचरित्र यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी जीवनात गुरुकृपा आणि दत्तकृपा यासाठी गुरुचरित्र वाचावेच. कारण या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. त्यास गुरुचरित्र सप्ताह म्हणतात. श्री गुरुदेव दत्तांची जन्मकथा अवतार महिमा असून हा उत्सव अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !
हे दत्त देवा जसे २४ गुरू आपण केले, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही येऊ दे!
दत्त येऊनिया उभा ठाकला।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला।।
(लेखिका, आकाशवाणी निवेदिका आहेत)