
सध्या सहकार चळवळीला मदतीची गरज आहे, हे मला मान्य आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे सहकार खाते काढले असल्याचे शाह म्हणाले. सहकारातील दोष आपल्याला काढावे लागतील. पण सहकार चळवळीवर ही वेळ का आली? असा सवालही त्यांनी यावेळी केला. महाराष्ट्रामध्ये जिल्हा बँक या आदर्श मॉडेल असल्याचे शाह यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शाह यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहिले . या मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथं विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात शहा पुढे म्हणाले की, मला आनंद आहे हा प्रवरा नगर कारखाना आजही सहकारी आहे. नाहीतर अनेक कारखाने खासगी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे खातं का काढलं हे सांगण्यासाठी मी येथे आलो असल्याचे शाह यावेळी म्हणाले. मोदी सरकारने साखर कारखान्याच्या अभ्यास केला आणि प्रश्न सोडवले असल्याचं शाह यांनी यावेळी नमूद केलं.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं.
देवेंद्र फडणवीस म्हणले की, सहकार चळवळ मोडीत निघाली असे म्हणत आहेत तेच सहकारी साखर कारखाने विकत घेत आहेत. अशी अप्रत्यक्ष टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर नाव न घेता केली. सहकारी साखर कारखाने नेत्यांच्या घशात घातले अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. त्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकाराला जगविण्याचं काम केलं असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.